सैनू गोटासह इतर चौघांचा न्यायालयाने जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 01:37 IST2017-02-06T01:37:11+5:302017-02-06T01:37:11+5:30
एटापल्ली पोलिसांनी सैनू गोटा व मंगेश होळी यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले होते.

सैनू गोटासह इतर चौघांचा न्यायालयाने जामीन नाकारला
न्यायालयीन कोठडीत रवानगी : रामदास जराते व जयश्री जराते यांनाही अटक
गडचिरोली : एटापल्ली पोलिसांनी सैनू गोटा व मंगेश होळी यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले होते. तर याच प्रकरणातील रामदास जराते त्यांच्या पत्नी जयश्री रामदास जराते यांना शनिवारी अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले. चौघांनाही अहेरी न्यायालयाने जामीन नाकारत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांनी सैनू गोटा, मंगेश होळी, रामदास जराते यांना शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी अटक केली होती. सैनू गोटा व मंगेश होळी यांना ३० जानेवारी रोजी पुन्हा अटक करून त्यांना ३१ जानेवारी रोजी अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने शनिवारपर्यंत पीसीआर दिला होता. शनिवारी पुन्हा पोलिसांनी गोटा व होळी यांना हजर केले असता, न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
याच प्रकरणातील रामदास जराते व त्यांच्या पत्नी जयश्री जराते यांना शनिवारी अटक केली होती. रविवारी त्यांना हजर केले असता, न्यायालयाने त्यांनाही जामीन नाकारत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अशी माहिती एटापल्ली पोलीस स्टेशनचे ठाणेदार राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
विशेष म्हणजे, रामदास जराते यांना पोलिसांनी दुसऱ्यांदा अटक केली आहे. यापूर्वीही पोलिसांनी जराते यांना आरमोरी येथून अटक केली होती. एटापल्ली पोलिसांनी सैनू गोटा व मंगेश होळी यांच्या विरोधात एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये कलम ३६५, ३६४ (अ), १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. (नगर प्रतिनिधी)