होळींकडून न्यायालयाचा अवमान

By Admin | Updated: February 10, 2017 02:12 IST2017-02-10T02:12:29+5:302017-02-10T02:12:29+5:30

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून निवडून आलेले डॉ. देवराव होळी यांच्या विरोधात उच्च

Court deferred by Holi | होळींकडून न्यायालयाचा अवमान

होळींकडून न्यायालयाचा अवमान

नामदेव उसेंडी यांचा आरोप : निवडणूक विभागाने गुन्हा दाखल करावा
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून निवडून आलेले डॉ. देवराव होळी यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला असून या निकालात त्यांचे आमदारकीचे पद रद्द केले आहे. तरीही डॉ. देवराव होळी हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान स्वत:ला आमदार समजूनच निवडणुकीचा प्रचार करीत आहेत. हा न्यायालयाचा अवमान आहे. त्याचबरोबर निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे डॉ. देवराव होळी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे.
डॉ. देवराव होळी यांचा राजीनामा मंजूर झाला नसनाताही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला. या विरोधात नारायण जांभुळे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. १९ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने डॉ. देवराव होळी यांच्या विरोधात निकाल दिला. या निकालामध्ये न्यायालयाने डॉ. देवराव होळी यांचे आमदारकीचे पद रद्द (डिस्कॉलीफॉय) केले आहे. त्याचबरोबर २०१४ ची निवडणूक रद्द केली. सदर जागा रिक्त असल्याचे आपल्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने डॉ. होळी यांना सर्वाेच्च न्यायालयात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यांचे पद गोठवित असल्याचा निकाल दिला आहे. सदर निकालाची प्रत तत्काळ विधानसभा अध्यक्षांना कोर्टाच्या मार्फतीने पाठविली जाते. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर डॉ.होळी यांची आमदारकी संपली आहे. तरीही डॉ. देवराव होळी हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान प्रचार करीत आहेत. निवडणुकीसाठी भाजपतर्फे लावलेल्या बॅनरवर डॉ. होळी यांचा उल्लेख माजी आमदार असा न करता, आमदार असा करण्यात आला आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे. त्याचबरोबर जनतेची दिशाभूलही होत आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक विभागाने डॉ. होळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. डॉ. होळी यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे काँग्रेस पक्षाच्या मार्फतीने तक्रार केली जाईल, अशी माहिती माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली आहे. जनतेनी डॉ. होळी यांच्यापासून सावध राहावे. डॉ. होळी यांच्या वेतन तसेच इतर प्रशासकीय बाबींवर झालेला खर्च पूर्णपणे वसूल करून तो शासनाकडे जमा करावा, अशी मागणीही डॉ. उसेंडी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. राम मेश्राम, नगरसेवक सतीश विधाते, राजेश ठाकूर, सुमेध तुरे, सी. बी. आवळे, मसराम, निशांत नैताम, विनोद भोयर, तुळशीदास भोयर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Court deferred by Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.