पाच ग्रामपंचायत सदस्य बनले नगरसेवक
By Admin | Updated: November 13, 2015 01:27 IST2015-11-13T01:27:05+5:302015-11-13T01:27:05+5:30
ग्राम पंचायतीचे सदस्य म्हणून काम केलेल्या पाच सदस्यांना नागरिकांनी नगरसेवक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

पाच ग्रामपंचायत सदस्य बनले नगरसेवक
कुरखेडा नगर पंचायत : १२ सदस्य नवीन
कुरखेडा : ग्राम पंचायतीचे सदस्य म्हणून काम केलेल्या पाच सदस्यांना नागरिकांनी नगरसेवक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तर १२ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
कुरखेडा नगर पंचायतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. ६ नोव्हेंबर रोजी मतदान होवून ७ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित झाला. यामध्ये अनेक अनपेक्षित निकाल लागले. नगर पंचायतीची निवडणूक १७ सदस्यांसाठी घेण्यात आली. यामध्ये चार सदस्य हे यापूर्वीच्याच ग्राम पंचायतीच्या कार्यकारिणीमध्ये होते. तर एक सदस्य पाच वर्षांपूर्वी ग्राम पंचायत सदस्य म्हणून कार्यरत होता. सलग पाच वर्ष सरपंच म्हणून कार्यरत असलेल्या आशा तुलावी प्रभाग क्र. ३ मधून निवडून आल्या आहेत. ग्राम पंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या जयश्री धाबेकर प्रभाग क्र. १३ मधून निवडून आल्या आहेत. शाहेद्रा मुघल प्रभाग क्र. १४, कलाम शेख प्रभाग क्र. १६ मधून निवडून आल्या आहेत. डॉ. महेंद्र मोहबंशी हे पाच वर्षांपूर्वी ग्राम पंचायतीचे सदस्य होते. ते सुद्धा निवडून आले आहेत. इतर १२ सदस्य मात्र नवीन असून त्यांच्याकडे सभागृहात काम करण्याचा अनुभव नसला तरी उत्साह मात्र दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)