काेरची : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मयालघाट गावात अजूनही भाैतिक साेयीसुविधा पाेहाेचल्या नाहीत. गाेदिंया-गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव वसले आहे. या ठिकाणी चौथीपर्यंत शाळा आहे. हे गाव जंगलाने वेढले आहे.
कुटीर उद्याेग पूर्वपदावर
गडचिराेली : जिल्ह्यात शेतीवर आधारित अनेक कुटीर उद्याेग आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत हे सर्व उद्याेग बंद पडले हाेते. अनलाॅकची प्रक्रिया राबविल्यानंतर आता हे उद्याेग पुन्हा सुरू झाले आहेत. या उद्याेगांची उलाढाल वाढली आहे.
आलापल्लीतील थ्री-जी सेवा कुचकामी
आलापल्ली : येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे आहे. मात्र, याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे.
बायोमेट्रिक मशीन बंद, कर्मचारी बिनधास्त
आलापल्ली : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, मशीन बंद असल्याने कर्मचारी बिनधास्त झाले आहेत.
ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयीचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. गेल्या पाच वर्षांत ट्रॅक्टर अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
मातीचे बंधारे बांधा
आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडले आहेत. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.
स्वच्छतेचा विसर
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक कार्यालयांत पसरलेल्या घाणीमुळे शासकीय कार्यालयांतील स्वच्छता पाळण्याच्या प्रयत्नाला हरताळ फासला आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याने या ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
खाऊचा दर्जा खालावला
अहेरी : अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून या शालेय पोषण आहाराचा दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थी सदर पोषण आहार खात नाहीत. परिणामी पोषण आहार फेकून द्यावा लागतो. आहाराच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व हा कचरा दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
वाहतुकीची काेंडी
गडचिराेली : चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरातून एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. दाेन माेठमाेठी वाहने समाेरासमाेर आल्यानंतर वाहतुकीची काेंडी हाेते. दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्याची मागणी हाेत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.
खासगी स्पर्धक गरजेचे
धानाेरा : तालुक्यात खासगी कंपन्यांचे माेबाइल टाॅवर नाहीच्या बराेबर आहेत. त्यामुळे बीएसएनएलची एकाधिकारशाही आहे. ९० टक्के ग्राहक बीएसएनएलचे आहेत. मात्र, बीएसएनएलने सेवेत सुधारणा केली नसल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. काही ठिकाणी टाॅवर आहेत. मात्र, ते काम करीत नाही.
अनेक पथदिवे बंद
गडचिराेली : आरमाेरी मार्गावर कठाणी नदीपर्यंत पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक पथदिवे बंद आहेत. या मार्गावर रात्री व पहाटेला शेकडाे नागरिक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे नगर परिषदेने या मार्गावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुग्ध योजना राबवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५ पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यामुळे दुग्ध याेजना राबवावी.
वास्तूची दुरुस्ती करा
सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. अनेक वर्षांपासून मागणी केली जात असतानाही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
दत्तमंदिरात सुविधा द्या
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे मंदिर आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु, मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून, मंदिर परिसरात सोयीसुविधा देण्याची मागणी होत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होताना दिसून येते.
शौचालय-मुत्रिघर बांधा
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावर भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणांसाठी दररोज बस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मुत्रिघर उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अंतर्गत रस्ते खड्डेमय
देसाईगंज : शहरातील पेट्रोल पंप ते हनुमान वाॅर्डातील साई मंदिरापर्यंत अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे पादचारी, तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघातही घडू शकतो. त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पाण्याचा अपव्यय
देसाईगंज : शहरात सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळांना बऱ्याच ठिकाणी तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. वाॅर्डांमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तत्काळ तोट्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.