पाण्याअभावी शेतीचा खर्च वाढला
By Admin | Updated: August 27, 2015 01:45 IST2015-08-27T01:45:28+5:302015-08-27T01:45:28+5:30
गडचिरोली जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात धान रोवणी कामाला सुरुवात झालेली नाही.

पाण्याअभावी शेतीचा खर्च वाढला
पाऊस बेपत्ता : शेतात कचऱ्याचे प्रमाण वाढले
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात धान रोवणी कामाला सुरुवात झालेली नाही. शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या पिकांमध्ये तसेच मोकळ्या शेतांमध्येही मोठ्या प्रमाणावर गवत उगविले असून यंदा पावसाअभावी शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामात पावसाच्या भरवशावरच शेती करतो. यंदा सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली आहे. अनेक तालुक्यात अद्याप गतवर्षीच्या सरासरी एवढाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केलेली नाही. जुलै, आॅगस्ट महिन्यात प्रचंड उकाडा वातावरणात निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतामानामुळे रोवणी झालेले धानपीकही करपायला लागले आहे. शेतामध्ये पाण्याअभावी कचरा मोठ्या प्रमाणावर उगवला असून हा कचरा साफ करण्यासाठी महिला मजुरांची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक ताळेबंद कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. (तालुका प्रतिनिधी)