कोरोनामुळे दीडपट जास्त ऑक्सिजनचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:02 IST2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:02:08+5:30
गंभीर स्थितीतील रूग्णाला ऑक्सिजनची गरज भासत असल्याने सर्वच रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन भरलेले सिलिंडर ठेवले जातात. आकस्मिक स्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात नऊ ग्रामीण रूग्णालये, तीन उपजिल्हा रूग्णालये, एक महिला व बाल रूग्णालय तसेच जिल्हा रूग्णालय आहे.

कोरोनामुळे दीडपट जास्त ऑक्सिजनचा पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासते. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याबरोबरच ऑक्सिजनची मागणीसुध्दा वाढत आहे. यापूर्वी जिल्हाभरातील ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, महिला व बाल रूग्णालय व जिल्हा रूग्णालयाला महिनाभरात १५० ते २०० ऑक्सिजनचे सिलिंडर लागत होते. कोरोनाचे रूग्ण वाढल्यापासून २५० ते ३०० सिलिंडरचा वापर होत असून त्यानुसार पुरवठा केला जात आहे.
गंभीर स्थितीतील रूग्णाला ऑक्सिजनची गरज भासत असल्याने सर्वच रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन भरलेले सिलिंडर ठेवले जातात. आकस्मिक स्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात नऊ ग्रामीण रूग्णालये, तीन उपजिल्हा रूग्णालये, एक महिला व बाल रूग्णालय तसेच जिल्हा रूग्णालय आहे. या सर्वच रूग्णालयांमध्ये कृत्रिमरित्या सिलींडरमध्ये भरलेल्या ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाला श्वास घेण्यास अडचण होत असल्याने कृत्रीम ऑक्सिजनचा पुरवठा केला जाते. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात पुन्हा पाच महिने पुरेल एवढा ऑक्सिजन सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. जिल्हा विकास निधी व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून मागील दोन वर्षात रूग्णालयांचा कायापालट करण्यात आला आहे. सर्वच रूग्णालयातील प्रत्येक बेड सेंट्रल ऑक्सिजन सक्शन पाईंटने जोडण्यात आला आहे. त्यामुळे रूग्णाला ऑक्सिजनची गरज भासल्यास वेळेवर धावपळ करावी लागत नाही.
विशेष म्हणजे अद्याप जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात एकाही कोरोनारुग्णाचा मृत्यू झालेला नाही, हे विशेष.
नागपूर येथून ऑक्सिजनचा पुरवठा
नागपूर येथील एका नोंदणीकृत कंपनीकडून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा गडचिरोली येथे द्वारपोच केला जाते. जम्बो सिलिंडर ५१० रुपयाला द्वारपोच उपलब्ध होते. आठवड्यातून दोन वेळा प्रत्येकी ९० सिलिंडरचा पुरवठा केला जाते. सिलिंडरचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याने आजपर्यंत कधीच ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवला नाही.
१५९३ सिलिंडरचा साठा
जिल्हाभरात ५५२ जम्बो सिलिंडर, ६८६ मध्यम सिलिंडर व ५१ लहान सिलिंडर भरून आहेत. या व्यतिरिक्त गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात १०० जम्बो सिलिंडर, १५० मध्यम सिलिंडर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हाभरातील सेंट्रल ऑक्सिजन सक्शन पाईंटला ५४ सिलिंडर जोडण्यात आले आहेत. दर आठवड्याला १८० भरलेले सिलिंडर उपलब्ध होतात.
२७०० पीपीई कीट उपलब्ध
कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांवर उपचार करताना डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट उपलब्ध करून दिली जाते. दरदिवशी ५० ते ६० कीटचा वापर होते. जिल्ह्यात सध्या २ हजार ७०० पीपीई कीट उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. आता जिल्हा सामान्य रुग्णालयासोबत तालुकास्तरावर कोरोनारुग्णांना ठेवले जात आहे.