रेल्वेमार्ग उभारणी वेळेत होण्यासाठी समन्वय राखा
By Admin | Updated: August 6, 2016 00:59 IST2016-08-06T00:59:49+5:302016-08-06T00:59:49+5:30
वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी विविध विभागांनी समन्वय राखून

रेल्वेमार्ग उभारणी वेळेत होण्यासाठी समन्वय राखा
वडसा-गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागप्रमुखांना निर्देश
गडचिरोली : वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी विविध विभागांनी समन्वय राखून परस्परांच्या संपर्कात राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी शुक्रवारी येथे केले. जिल्हाधिकारी यांच्या कक्षात यासंदर्भात एक बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस रेल्वेचे कार्यपालन अभियंता प्रदीप गोस्वामी, देसाईगंजचे उपवनसंरक्षक होशींग, गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबत्तुला, सहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे आदी उपस्थित होते. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम येत्या ३ वर्षात पूर्ण करण्याची योजना आहे. यात सर्वेक्षण झालेले असून प्रकल्प आता निविदास्तरावर आहे. या प्रकल्पात केंद्र-राज्य शासनाचा ५०-५० टक्के वाटा राहणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आता प्रस्तावित मार्गासाठी लागणारी जमीन शासकीय, वन विभाग आणि खाजगी व्यक्ती अशा तीन गटात आहे. सदर मार्गासाठी लागणारी वनजमीन कोणती आहे हे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी जाणून घ्यावे व त्याबाबतच अहवाल आठ दिवसात सादर करावा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
या मागार्साठी लागणारी शासकीय जमीन वडसा तसेच गडचिरोली उपविभागांतर्गत आहे. या दोन्ही विभांगामध्ये समन्वय असावा असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, खाजगी जमीनीची किती आवश्यकता आहे याची माहिती घेण्यात यावी व त्या जागेचे भूसंपादन कशा पध्दतीने होणार आहे याबाबतची स्पष्टता पुढील बैठकीपूर्वी करुन घ्यावी. या रेल्वे मार्गाचे काम गतिमान पध्दतीने व्हावे यासाठी यापुढील काळामध्ये नियमित बैठकांची गरज आहे. त्यामुळे याचा नियमित बैठकीत पाठपुरावा घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.