लढा देण्याचा स्वयंपाकींचा निर्धार

By Admin | Updated: June 8, 2014 23:53 IST2014-06-08T23:53:16+5:302014-06-08T23:53:16+5:30

राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दुपारचे जेवण बनविणार्‍या स्वयंपाकी महिलांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार

Cook's determination to fight | लढा देण्याचा स्वयंपाकींचा निर्धार

लढा देण्याचा स्वयंपाकींचा निर्धार

१५ व १६ जूनला मोर्चा : शालेय पोषण आहार बनविणार्‍या महिलांचे प्रश्न
कुरखेडा : राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दुपारचे जेवण बनविणार्‍या स्वयंपाकी महिलांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार कुरखेडा येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभेमध्ये करण्यात आला. १५ व १६ जूनला मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.
कुपोषणाचे प्रमाण कमी करून विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत स्वयंपाक बनविण्याचे काम गावातील महिलांना दिले जाते. शेकडो विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी उचलणार्‍या महिलांना अत्यंत कमी मोबदला दिला जातो. मोबदल्यामध्ये वाढ करावी, त्याचबरोबर त्यांना इतरही सोयी-सुविधा देण्यात याव्या, यासाठी मागील अनेक वर्षांंपासून स्वयंपाकी महिलांनी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र शासनाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. स्वयंपाकी महिलेला दिवसाकाठी केवळ २0 ते ३0 रूपये मजुरी पडते. रोहयोची मजुरी १५0 रूपयाच्यावर असतांनाही स्वयंपाकी महिलांना मात्र २0 ते ३0 रूपयातच समाधान मानावे लागत आहे. कमी मजुरीमुळे बहुतांश गावांमध्ये शालेय आहार बनविण्यास महिला तयार होत नाही. अशी परिस्थिती असतांनाही शालेय पोषण आहार योजना सुरू झाली. तेव्हापासून काही महिला मात्र सातत्याने काम करीत आहेत.
आयटकच्यावतीने शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिलांचा नुकताच मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला तालुक्यातील सर्वच शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिला उपस्थित होत्या. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयटकचे कार्याध्यक्ष प्रा. रमेश कोरचा, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, विमल बर्डे, संगीता सोनटक्के, तालुकाध्यक्ष निर्मला साखरे आदी उपस्थित होते. मेळाव्यात शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांना चपराशी कम कुक पदावर नियुक्त करावे, महिन्याकाठी किमान १0 हजार रूपये वेतन देण्यात यावे, २६ फेब्रुवारीचा जीआर रद्द करण्यात यावा, या कर्मचार्‍यांना कायम करण्यात यावे आदी मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचे ठरविण्यात आले. यासाठी १५ व १६ जून रोजी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात अंगणवाडी महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Cook's determination to fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.