घोेट तालुक्याच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार
By Admin | Updated: August 27, 2016 01:21 IST2016-08-27T01:21:41+5:302016-08-27T01:21:41+5:30
चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून घोट हा नवीन तालुका निर्माण करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

घोेट तालुक्याच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार
आंदोलकांना आमदारांचे आश्वासन : बाजारपेठ, शाळा कडकडीत बंद
घोट : चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून घोट हा नवीन तालुका निर्माण करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावून घोट तालुका निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना तेथे बोलावून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी घोट येथे उपस्थित जनसमुदायास दिले.
घोट तालुक्याची निर्मिती करावी यासाठी शुक्रवारी घोट येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद ठेवण्यात आले. या आंदोलनात व्यापारी, नागरिकही सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व घोट तालुका निर्माण संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के, पं. स. उपसभापती मंदा दुधबावरे, घोटचे सरपंच विनय बारसागडे, उपसरपंच साईनाथ नेवारे, सिमुतलाचे सरपंच सजल बिश्वास, भाडभिडीचे सरपंच एकनाथ भुरसे, पं. स. चे माजी उपसभापती माधव घरामी, उपसरपंच गव्हारे, मक्केपल्लीचे सरपंच डी. डी. कांदो, गिरीश उपाध्ये, विलास गण्यारपवार, बाळाजी येनगंटीवार, डॉ. नंदकिशोर अध्यंकीवार, भारती उपाध्ये, उर्मिला पोगुलवार यांनी केले.
यावेळी आंदोलनाला आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेट देऊन घोट तालुका संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त आंबेडकर चौक व गावातील प्रमुख वॉर्डात ठेवण्यात आला होता.
आमदार होळी यांना दिलेल्या निवेदनात घोट तालुक्याची मागणी मागील ३५ वर्षांपासूनची असून अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. नागपूर अधिवेशनात साखळी उपोषण करण्यात आले. घोट परिसरात २१ ग्रामपंचायती असून शासनाची विविध कार्यालये, सहकारी संस्था आहेत. घोट ही मोठी बाजारपेठ असल्याने या गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. (वार्ताहर)