हद्दीच्या वादात मृतदेहाची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:11 IST2018-08-06T23:11:03+5:302018-08-06T23:11:26+5:30
आलापल्ली-सिरोंचा मार्गावर रेपनपल्ली गावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत युवक जागीच ठार झाला. सदर अपघात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. घटनास्थळ नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दित येते, यावरून रेपनपल्ली व राजाराम पोलीस स्टेशनमध्ये वाद झाला. यामुळे मृतदेह जवळपास तीन तास जागेवरच पडून होता. पोलिसांच्या या कृत्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हद्दीच्या वादात मृतदेहाची अवहेलना
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मार्गावर रेपनपल्ली गावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत युवक जागीच ठार झाला. सदर अपघात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. घटनास्थळ नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दित येते, यावरून रेपनपल्ली व राजाराम पोलीस स्टेशनमध्ये वाद झाला. यामुळे मृतदेह जवळपास तीन तास जागेवरच पडून होता. पोलिसांच्या या कृत्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अजय चैतू कुम्मा (२४) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो भामरागड तालुक्यातील गुब्बागुडा येथील रहिवासी आहे. अजयला ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीसह अजय रस्त्यावरच कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह व क्षतिग्रस्त दुचाकी रस्त्याच्या अगदी मधोमध पडली होती. त्यामुळे ट्रकसारखी मोठी वाहने नेण्यास अडथळा निर्माण झाला होता. ट्रकचालकाने ट्रक रस्त्याच्या बाजुला उभा केला.
घटनास्थळ हे रेपनपल्लीपासून पाच किमी अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांनी घटनेची माहिती रेपनपल्ली पोलीस स्टेशनला दिली. रेपनपल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पहाणी केली. मात्र घटनास्थळ हे राजाराम पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने आपण मृतदेह उचलणार नाही व पंचनामा सुध्दा करणार नाही, असा निर्णय घेऊन ते परत आले. त्यानंतर याबाबतची माहिती राजाराम पोलीस स्टेशनला देण्यात आली. राजाराम पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह उचलला. मात्र दोन पोलीस स्टेशनच्या या वादात मृतदेह जवळपास तीन तास घटनास्थळावरच पडून होता.
पोलिसांच्या या असंवेदनशील वृत्तीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.