धान्य वितरण प्रणालीवर आणणार ‘कंट्रोल’
By Admin | Updated: September 9, 2015 01:31 IST2015-09-09T01:31:18+5:302015-09-09T01:31:18+5:30
गावातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत चालणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाच्या कारभारावर नियंत्रण ठेवून वितरण प्रणालीत काळा बाजार होणार नाही,

धान्य वितरण प्रणालीवर आणणार ‘कंट्रोल’
ग्राम दक्षता समितीच्या सभेत ठराव पारित : स्वस्त धान्य दुकानदारांना सदस्यांनी दिल्या सूचना
आलापल्ली : गावातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत चालणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाच्या कारभारावर नियंत्रण ठेवून वितरण प्रणालीत काळा बाजार होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असा ठराव आलापल्ली ग्राम पंचायतीमध्ये मंगळवारला झालेल्या ग्राम दक्षता समितीच्या पहिल्या सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानदारांवर समितीच्या सदस्यांची करडी नजर राहणार आहे.
आलापल्ली ग्राम पंचायतींतर्गत २१ आॅगस्ट रोजी ग्राम पातळीवर विविध समित्या गठित करण्यात आल्या. यावेळी ग्राम दक्षता समितीही गठित करण्यात आली. या समितीची पहिली सभा आलापल्लीच्या ग्राम पंचायतीच्या सरपंच रेणुका कुळमेथे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला प्रामुख्याने उपसरपंच पुष्पा अलोणे, ग्राम दक्षता समितीचे सचिव एकनाथ चांदेकर आदींसह समितीचे सर्व सदस्य व ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.
शासनाच्या परीपत्रकानुसार सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राम दक्षता समितीला मोठे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र बहुतांश समिती सदस्यांच्या उदासिनतेमुळे धान्य वितरण प्रणालीत गैर व्यवहार होत आहे यावर चर्चा झाली. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनी दुकानांसमोर रेटबोर्ड लावावे, त्यात धान्याचा दर, साठा आदींचा उल्लेख असावा, दर महा दर्जेदार प्रतिच्या धान्याची उचल करावी, महिन्याच्या आत कार्डधारकांना धान्य वितरित करावे, अशा सूचना समितीमार्फत गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आल्या.
आलापल्लीच्या ग्राम दक्षता समितीची मासिक सभा प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला घेण्याचे या सभेत ठरविण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांबाबत नागरिकांना अडचण असल्यास याबाबतचा प्रस्ताव तयार करून अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल, असेही या सभेत ठरविण्यात आले. सभेला समितीचे सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)