कंत्राटदाराला तेलंगणातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 01:35 IST2016-07-25T01:35:35+5:302016-07-25T01:35:35+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षक प्राथमिक संघटना तालुका शाखा सिरोंचाच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास झालेल्या...

कंत्राटदाराला तेलंगणातून अटक
शिक्षक संघटना आक्रमक : मुख्याध्यापकाला मारहाण केल्याचे प्रकरण
सिरोंचा : महाराष्ट्र राज्य शिक्षक प्राथमिक संघटना तालुका शाखा सिरोंचाच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास झालेल्या मारहाण प्रकरणावर आक्रमक पवित्रा घेऊन रविवारी सिरोंचा पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपी कंत्राटदारास तत्काळ अटक करा, अशी मागणी पोलीस निरिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीची दखल घेऊन सिरोंचा पोलिसांनी तेलंगणा राज्यातील महादेवपूर गावातून आरोपी कंत्राटदार राजन्ना पोचम तोटा रा. रामंजापूर याला सायंकाळच्या सुमारास अटक केली.
कंत्राटदार राजन्ना पोचम तोटा याने नासिरखॉपल्ली जि.प. शाळेत स्वच्छतागृहाचे बांधकाम केले. या बांधकामाच्या प्रलंबित देयकासंदर्भात जाब विचारण्यासाठी कंत्राटदार तोटा हे शनिवारी शाळेत गेले. दरम्यान मुख्याध्यापक अग्गुवार व कंत्राटदार तोटा यांच्यात बाचाबाची झाली. राग अनावर झाल्याने कंत्राटदार राजन्ना तोटा याने मुख्याध्यापक रमेश अग्गुवार यांना बेदम मारहाण केली. तक्रारीवरून पोलिसांनी कंत्राटदार तोटा याच्या विरोधात भादंविचे कलम ३२३, २२४, ३५३, ३४२ अन्वये शनिवारी गुन्हा दाखल केला होता.
कंत्राटदाराला महादेवपुरातून गाठले
कंत्राटदाराच्या मारहाणीत जखमी झालेले नासिरखॉपल्ली जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रमेश अग्गुवार यांच्या तक्रारीवरून सिरोंचा पोलिसांनी रविवारी सायंकाळी ६ वाजता तेलंगणा राज्याच्या महादेवपूर गावातून मारहाण प्रकरणातील आरोपी कंत्राटदार राजन्ना पोचम तोटा रा. रामंजापूर याला अटक करून सिरोंचा पोलीस ठाण्यात आणले.