भूऱ्यानटोलावासीय पितात दूषित पाणी
By Admin | Updated: April 9, 2017 01:37 IST2017-04-09T01:37:22+5:302017-04-09T01:37:22+5:30
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भुऱ्यानटोला येथील हातपंपामधून लाल रंगाचे दूषित पाणी येत आहे.

भूऱ्यानटोलावासीय पितात दूषित पाणी
प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यामुळे लघवीचा आजार बळावला
मानापूर/देलनवाडी : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भुऱ्यानटोला येथील हातपंपामधून लाल रंगाचे दूषित पाणी येत आहे. असे घाण पाणी नागरिकांना प्यावे लागत असून त्यामुळे नागरिकांना लघवीचा त्रास बळावला आहे.
भुऱ्यानटोला येथील हातपंपातून लाल रंगाचे पाणी येत असल्याने नागरिकांना लघवीचा त्रास होत आहे, अशी माहिती गावातील नागरिक अबरशहा दुगा यांनी लोकमतशी बोलताना दिली. ग्रामपंचायत प्रशासनाने अशा प्रकारचे दुषीत पाणी पिऊ नये, अशा सूचना गावातील नागरिकांना दिल्या आहेत. त्यामुळे बरेचशे नागरिक या बोअरवेलचे दूषित पाणी पित नाही. मात्र या पाण्याचा वापर भांडी, कपडे धुणे व इतर बाह्य कामांच्या वापरासाठी केला जात असल्याची माहिती भुऱ्यानटोलाच्या सरपंच सरिता दुगा यांनी दिली. सदर प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संपतराव आळे यांनी तत्काळ भुऱ्यानटोला गावाला भेट देऊन पाण्याची समस्या जाणून घेतली. गावात विहीर खोदण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विहीर खोदताना दगड लागल्याने पाणी अपुरे लागले. गावात केवळ दोनच हातपंप आहे. त्यापैकी एका हातपंपातून लाल रंगाचे दुषीत पाणी येत आहे. त्यामुळे उर्वरित एकाच हातपंपावर नागरिकांना तहाण भागवावी लागत आहे. त्यानंतर दुसरे बोअरवेल खोदतानाही मोठे दगड लागल्याने पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही, अशी माहिती सरपंच सरीता दुगा यांनी जि.प. सदस्य आळे यांना भेटीप्रसंगी दिली. भुऱ्यानटोला गावात तत्काळ नवीन विहीर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत मंजूर करण्यात यावी, अशी मागणी सरपंच दुगा यांनी आळे यांच्याकडे यावेळी केली.
भुऱ्यानटोला येथील पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी नवीन विहीर मंजूर करण्यात येईल. यासाठी आपण जि.प. प्रशासनाकडे पाठपुरावा करणार, असे आश्वासन जि.प. सदस्य आळे यांनी सरपंच दुग्गा व तेथील नागरिकांना दिले. यावेळी प्राचार्य डी. के. मेश्राम, भास्कर राऊत, सरपंच सरीता दुगा, देवराव सहारे, किरण दुगा, मारोती पदा, रायसिंग पदा आदी उपस्थित होते. (वार्ताहर)