भेंडाळा येथील सहकारी बँक शाखेत अनेक ग्राहकांची बँक खाती आहेत. परिसराच्या १० ते १५ गावातील खातेदार बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात. चामोर्शी तालुक्यातील जिल्हा सीमेवर असलेल्या भेंडाळा परिसरातील अनेक गावातील नागरिकांची खाती बँकेत असल्यामुळे येथे नेहमी गर्दी दिसून येते. प्रत्येक शासकीय योजनेचा आर्थिक लाभ, कामाचा मोबदला बँकेच्या खात्यावरच जमा केला जातो. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे अर्थसहाय्य राष्ट्रीयीकृत बँक खात्यामध्ये जमा केले जाते. महिला बचत गटाचा वाढलेला व्याप विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसहाय्य, गरिबांना मिळणाऱ्या घराच्या बांधकामाचे आर्थिक अर्थसहाय्य, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, सोने तारण इतर प्रकारचे कर्ज आणि विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदत तसेच वैयक्तिक आर्थिक व्यवहार असे सर्वच व्यवहार बँकेमधून होत असतात. ऑनलाईन प्रक्रियेमुळे बँकेचे व्यवहार सोपे झाले आहेत. मात्र बरेचदा लिंक फेलमुळे सुविधा त्रासदायक ठरत असते. ग्राहकांची वाढलेली संख्या आणि आर्थिक व्याप लक्षात घेता भेंडाळा येथे राष्ट्रीयीकृत बँकेची आवश्यकता आहे. त्यामुळे भेंडाळा येथे राष्ट्रीयीकृत बँकेची स्थापना करावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
बँक व्यवहारातील दिरंगाईने ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:36 IST