कमलापूर तालुका निर्माण करा!
By Admin | Updated: January 26, 2017 02:12 IST2017-01-26T02:12:32+5:302017-01-26T02:12:32+5:30
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासीबहूल क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कमलापूर या मध्यवर्ती गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा,

कमलापूर तालुका निर्माण करा!
नागरिकांची मागणी : पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर
कमलापूर : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासीबहूल क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कमलापूर या मध्यवर्ती गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी गावातील पदाधिकाऱ्यांनी मंत्रालय गाठून आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन सादर केले.
अहेरी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेले कमलापूर गाव परिसरातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव आहे. परंतु या भागात उद्योगधंदे नाही. सिंचनाची सोय नाही. गावात पक्के रस्ते नाही. उच्च शिक्षणाची सोय नाही. तसेच दळवळणाचे साधन नाही. या भागात शासनाच्या योजना पोहोचत नाही. शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. उत्तम आरोग्याचीही सोय नाही. अशा अनेक प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधांपासून तालुक्यातील जनता वंचित आहे. परिणामी या भागाचा विकास रखडला आहे. कमलापूर परिसराचा विकास साधायचा असेल तर कमलापूर गावाला तालुक्याचा दर्जा देणे गरजेचे आहे. या मागणीसाठी १९७२ पासून या भागातील नागरिक संघर्ष करीत आहेत. या मागणीसाठीच येथील सरपंच रजनिता गावडे, संतोष ताटीकोंडावार, सावित्री चिप्पावार, तालुका संघर्ष समिती अध्यक्ष गणेश सिडाम, विजय खरवडे यांनी मंत्रालयात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन सादर केले व गुरूदेव शाळा शासकीय करणे, तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. (वार्ताहर)