हलदी पुराणी उपसासिंचन प्रकल्पाच्या निर्मितीस वेग
By Admin | Updated: February 22, 2016 01:39 IST2016-02-22T01:39:32+5:302016-02-22T01:39:32+5:30
चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळख असलेल्या हलदी पुराणी उपसा सिंचन योजनेसाठी शासनाकडून निधी प्राप्त होताच या योजनेच्या कामाला गती प्राप्त झाली आहे.

हलदी पुराणी उपसासिंचन प्रकल्पाच्या निर्मितीस वेग
१० हजार हेक्टरला लाभ : २० गावांमध्ये वाहणार पाण्याची गंगा
प्रकाश बोधलकर लखमापूर बोरी
चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळख असलेल्या हलदी पुराणी उपसा सिंचन योजनेसाठी शासनाकडून निधी प्राप्त होताच या योजनेच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. २० गावातील सुमारे १० हजार हेक्टर शेत जमीन यामुळे ओलिताखाली येणार आहे.
लखमापूर बोरी परिसरातील गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हळदी पुराणी उपसा सिंचन योजनेला शासनाने मंजुरी दिली. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले व काही दिवसातच कामालाही सुरूवात झाली. वैनगंगा नदीवर या सिंचन योजनेचे बांधकाम करण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये वैनगंगा नदीला पाणी राहत असल्याने पावसाळ्यादरम्यान योजनेचे काम थंडबस्त्यात पडले होते. त्यानंतर आता मात्र कामाला गती प्राप्त झाली आहे. शासनाकडून वेळोवेळी निधी उपलब्ध होत असल्यानेही सदर योजनेचे काम २०१७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
या परिसरातील जमीन सुपीक आहे. मात्र पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील शेतकरी केवळ एकच उत्पादन घेत होता. मात्र उपसा सिंचन योजनेमुळे पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर वर्षातून दोन पीके घेण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाल्यास आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने या सिंचन योजनेचे काम निर्धारीत कालावधीत पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.