गुंडापुरीतील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अपूर्ण
By Admin | Updated: April 4, 2016 04:59 IST2016-04-04T04:59:54+5:302016-04-04T04:59:54+5:30
स्थानिक पंचायत समिती मार्फत बोटनफुंडी ग्रामपंचायत अंतर्गत गुंडापल्ली येथे सन २०१२-१३ वर्षात सुरू करण्यात

गुंडापुरीतील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अपूर्ण
भामरागड : स्थानिक पंचायत समिती मार्फत बोटनफुंडी ग्रामपंचायत अंतर्गत गुंडापल्ली येथे सन २०१२-१३ वर्षात सुरू करण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम चार वर्षानंतरही अपूर्ण स्थितीत आहे. येथील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी कार्यरत अंगणवाडी मदतनिसेला प्रचंड अडचणी येत आहेत.
गुंडापुरी या गावात १०० टक्के माडिया आदिम जमातीची लोकवस्ती आहे. बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या गावातील समस्या जाणून घेण्यासाठी गुंडापल्ली गावात एकदाही फिरकलेच नाही. त्यामुळे या गावात विविध समस्या कायम आहेत. गुंडापुरी येथे कंत्राटदारामार्फत इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व कंत्राटदारातील आर्थिक व्यवहारात काय झाले, हे ठाऊक नाही. तेव्हापासून या अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अर्धवटच आहे. गुंडापुरी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम कोणत्या अभियंत्याच्या नियंत्रणाखाली हाती घेण्यात आले. याबाबतची चौकशी करून सदर इमारतीचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी गुंडापुरीवासीयांनी केली आहे. इमारतीअभावी मदतनिस महिलेच्या घरी बालके पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत.
विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षणाचा मार्गही कठीण
४गुंडापुरी गावात पूर्वी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सदर शाळा बंद पाडून या गावातील प्राथमिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडापुरीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या विसामुंडी येथील प्राथमिक शाळेत दाखल केले. गुंडापुरी व विसामुंडी या गावादरम्यान बांडिया नदी आहे. याशिवाय या मार्गाने घनदाट जंगलही आहे. गुंडापुरीतील प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्याने या गावातील विद्यार्थ्यांना घनदाट जंगलातून बांडिया नदी ओलांडून पायवाटेने विसामुंडीच्या शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. पावसाळ्यात बांडिया नदीला पूर येत असल्याने गुंडापुरीतील विद्यार्थ्यांची शाळा अनेक दिवस बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही.