पुलाचे बांधकाम पूर्ण झाले मात्र जोडरस्त्याचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:19+5:30

महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या मधून प्राणहिता नदी वाहते. अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिकांची संस्कृती तेलंगणातील नागरिकांशी मिळतीजुळती आहे. तसेच अनेकांचे नातेवाईक तेलंगणात असल्याने नेहमीच ये-जा सुरू राहते. पूल नसल्याने प्राणहिता नदीच्या पात्रातून डोंग्याने प्रवास करावा लागत होता. हा प्रवास अतिशय धोकादायक होता.

The construction of the bridge was completed but there is no linkage | पुलाचे बांधकाम पूर्ण झाले मात्र जोडरस्त्याचा पत्ता नाही

पुलाचे बांधकाम पूर्ण झाले मात्र जोडरस्त्याचा पत्ता नाही

Next
ठळक मुद्देसमस्या कायम : वांगेपल्ली पुलाचे काम पूर्णत्वास

विवेक बेझलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम वांगेपल्ली जवळ सुरू आहे. पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. मात्र अजूनपर्यंत वांगेपल्ली ते पुलापर्यंत पोचमार्गाचे काम मंजूर करण्यात आले नाही.
महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या मधून प्राणहिता नदी वाहते. अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिकांची संस्कृती तेलंगणातील नागरिकांशी मिळतीजुळती आहे. तसेच अनेकांचे नातेवाईक तेलंगणात असल्याने नेहमीच ये-जा सुरू राहते. पूल नसल्याने प्राणहिता नदीच्या पात्रातून डोंग्याने प्रवास करावा लागत होता. हा प्रवास अतिशय धोकादायक होता. ही बाब तेलंगणा सरकारच्या लक्षात आल्यानंतर तेलंगणा सरकारने वांगेपल्ली गावाजवळ प्राणहिता नदीवर पूल बांधण्यास सुरूवात केली. यासाठी सुमारे ९० कोटी रुपये तेलंगणा सरकारने मंजूर केले. ३० नोव्हेंबर २०१४ रोजी कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरूवात झाली. कामाची गती कायम ठेवत तेलंगणा सरकारने पुलाचे काम केले. आता या पुलाचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातून पुलाला जोडणारा मार्ग बांधला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने वांगेपल्ली ते पुलापर्यंतचा केवळ दीड किमी अंतराचा मार्ग पाच वर्षांचा कालावधीत उलटूनही बांधला नाही. विशेष म्हणजे, अजूनपर्यंत या मार्गाला मंजुरी सुध्दा मिळाली नाही. स्थानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पोच रस्त्याबाबत विचारले असता, शासनाकडे दोनदा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र शासनाने अजूनपर्यंत मंजुरी दिली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे, अशी माहिती दिली.
या पुलाचा लाभ दोन्ही राज्यातील नागरिकांना होणार आहे. तेलंगणा सरकारने पुढाकार घेऊन सुमारे ९० कोटी रुपयांचा पूल बांधून दिला. पाच वर्षात पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र दीड किमीचा रस्ता महाराष्ट्र शासन बांधू शकले नाही. यावरून महाराष्ट्र व तेलंगणा शासन व प्रशासनातील फरक सहज लक्षात येते.

रस्त्याअभावी वाहतूक रखडणार
पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या पुलावरून खासगी व सार्वजनिक वाहतुकीला सुरूवात होईल. तेलंगणा सरकारने आपल्या राज्यात मार्ग बांधला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने मार्ग बांधला नसल्याने वाहतूक व्यवस्था सुरू होणार नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या पुलाचा उपयोग नागरिकांना करता येणार नाही. विद्यमान लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी रस्त्याचा मुद्दा लावून धरून रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.

Web Title: The construction of the bridge was completed but there is no linkage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.