कसारीला पाणी पुरवठा योजना बांधा
By Admin | Updated: July 31, 2016 02:10 IST2016-07-31T02:10:54+5:302016-07-31T02:10:54+5:30
राज्यस्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त करून नावारूपास आलेल्या कसारी गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना नाही.

कसारीला पाणी पुरवठा योजना बांधा
वित्तमंत्र्यांना निवेदन : पं.स.च्या सभापती मुनगंटीवारांना भेटल्या
देसाईगंज : राज्यस्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त करून नावारूपास आलेल्या कसारी गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे येथील महिलांना उन्हाळ्यात दरवर्षीच पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे या गावाला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना बांधून देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र सुध्दा निर्माण करण्यात यावे, अशी मागणी देसाईगंजच्या पंचायत समिती सभापती प्रिती शंभरकर यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नागपूर येथे शुक्रवारी भेटून त्यांच्याकडे ही मागणी केली.
कसारी गावाने आजपर्यंत निर्मल ग्रामपुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार यासारखे अनेक विसात्मक पुरस्कार जिंकले आहेत. जिल्ह्यातील इतर गावांना आदर्शवत वाटावे अशा प्रकारे या गावात स्वच्छता पाळली जाते. विकासाचे पुरस्कार जिंकणाऱ्या कसारी येथील महिलांना मात्र उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न या गावात गंभीर होतो. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये सुध्दा निराशेचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. या गंभीर बाबीकडे वित्तमंत्र्यांनी लक्ष घालून या गावाला पाणी पुरवठा योजना बांधून द्यावी, अशी मागणी केली आहे.
कसारी गाव कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जोडण्यात आले आहे. कोरेगाव हे कसारीपासून १० किमी अंतरावर आहे. एवढ्या दूर प्रत्येकच रूग्णाला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आरोग्याबाबतही येथील नागरिकांची हेळसांड होत असून रूग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वित्तमंत्र्यांनी या गावामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून द्यावे, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी नामदार मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. यावेळी मुनगंटीवार यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)