रेल्वे मार्गाने आलापल्ली कागजनगरशी जोडा
By Admin | Updated: April 18, 2015 01:36 IST2015-04-18T01:36:39+5:302015-04-18T01:36:39+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे मार्गाची निर्मिती करावी, अशी मागणी ....

रेल्वे मार्गाने आलापल्ली कागजनगरशी जोडा
अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे मार्गाची निर्मिती करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी रेल्वे मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या कागजनगर हे शहर आलापल्लीपासून ५५ किमी अंतरावर आहे. मात्र या दोन शहरांच्या मध्ये असलेल्या प्राणहिता नदीवर पूल नाही, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. तरीही या दोन शहरांमध्ये व्यापार व व्यवसाय केला जातो. पूर्वीपासूनच या दोन शहरांमध्ये रोटी-बेटी व सांस्कृतिक संबंधांची देवाणघेवाण होत राहिली आहे. केंद्र शासनाने पुढाकार घेत सदर मार्गाची निर्मिती केल्यास हैदराबाद ते नागपूर या दोन शहरांमधील अंतर कमी होण्यास मदत होईल.
देवलमरी येथील सिमेंट उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने या रेल्वे मार्गाचे विशेष महत्त्व राहणार आहे. रेल्वे मार्ग झाल्यास रोजगाराची समस्याही काही प्रमाणात सुटेल. दोन ठिकानांना रेल्वे मार्गाने जोडल्यास येथील विकासास चालना मिळू शकते. शिवाय अनेकांना रोजगारही प्राप्त होऊ शकतो. अहेरी तालुका दुर्गम असल्याने येथे रेल्वे पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र व दोन्ही राज्य शासनाने या मार्गाच्या निर्मितीसाठी पाऊल उचलावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, खा. अशोक नेते यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने पाठविण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र अरमरकर यांनी स्वीकारले.
यावेळी डॉ. ढेंगळे, विलास रापर्तीवार, अतुल उईके, इमाम शेख, राजेश वायलालवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)