राकाँच्या अटीने काँग्रेसची कोंडी

By Admin | Updated: March 2, 2017 02:04 IST2017-03-02T02:04:03+5:302017-03-02T02:04:03+5:30

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसकडून वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे संपर्क करण्यात येत होता.

Congress's stand on the terms of the agreement | राकाँच्या अटीने काँग्रेसची कोंडी

राकाँच्या अटीने काँग्रेसची कोंडी

आविसंने दोघांना सोडून पद द्यावे : -तर आम्ही जि. प.च्या सत्तेत सोबत येऊ
गडचिरोली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसकडून वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे संपर्क करण्यात येत होता. आदिवासी विद्यार्थी संघाला सोबत घेऊन जि. प. मध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने सोबत यावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. मात्र राष्ट्रवादीने आविसंला सत्तेत सोबत घेताना जि. प. सभापती अजय कंकडालवार व जि. प. सदस्य अनिता आत्राम कोणतेही पद जिल्हा परिषदेत घेणार नाही, असे ठामपणे सांगा व याची शाश्वती द्या, त्यानंतरच आम्ही तुमच्यासोबत येण्याबाबत तयार आहो, अशी अट काँग्रेससमोर घातली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मात्र काँग्रेसने राकाँच्या या अटीला दुर्लक्षित केले आहे व आविसंने कुणाला पदे द्यायची, हा पूर्णत: त्यांचा प्रश्न आहे, असे सांगून या प्रश्नावर हात वर केले आहे. या सर्व घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जवळ करण्याचा निर्णय घेतला व तशी माहिती काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला त्याच दिवशी दिली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जबाबदार नेत्याने लोकमतशी बोलताना दिली.
अहेरी विधानसभा क्षेत्रात कुठल्याही परिस्थितीत आदिवासी विद्यार्थी संघ आता भविष्यात वाढायला नको, याची पूर्ण काळजी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा ना. अम्ब्रीशराव आत्राम गट घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आविसंचे समिकरण जि. प. च्या सत्तेसाठी जुळून येण्यास अडचण निर्माण झाली आहे.
भाजपच्याही एका वर्तुळाने आदिवासी विद्यार्थी संघाच्या जि. प. सदस्यांचा भाजप प्रवेश करून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना शह देण्याचा प्रयत्न चालविला होता व तशी बोलणीही सुरू झाली होती. मात्र भाजपच्या संघ वर्तुळातील लोकांनी पक्षातीलच आत्रामविरोधक लोकांचा हा डाव हाणून पाडल्याने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन जि. प. मध्ये सत्ता स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला.
एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ सदस्यांशी पालकमंत्र्यांनी स्वतंत्र चर्चा करून त्यांचेही मन या आघाडीसाठी वळविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. या ज्येष्ठ सदस्यांचे पूर्ण समाधान पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर झाले व त्यानंतरच भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीवर अखेरचा शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसचे संख्याबळ २२ सदस्यांपर्यंतच पोहोचेल, अशी चिन्ह आहे.
अपक्ष सदस्य अतुल गण्यारपवार व ग्रामसभांच्या दोन सदस्यांनी अजूनही पाठिंब्याबाबत आपले पत्ते खुले केलेले नाही. त्यामुळे ते कुणाच्या बाजुने जातात, हे मतदानाच्या वेळेवरच कळेल. मात्र सत्ता पक्षाच्या बाजुचे संख्याबळ वाढण्याचीच दाट शक्यता आहे, असे भाजपचे लोक सांगत आहे. भाजपच्या राज्यस्तरावरील नेतृत्वानेही गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सर्व प्रयत्न करण्याची मुभा स्थानिक नेत्यांना दिलेली आहे. त्यामुळे भाजप-राकाँचा राजमार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress's stand on the terms of the agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.