काँग्रेसच्या जिल्हा निवड समिती बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना डावलले

By Admin | Updated: November 16, 2016 02:10 IST2016-11-16T02:10:17+5:302016-11-16T02:10:17+5:30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे

Congress's District Selection Committee meeting held women office bearers | काँग्रेसच्या जिल्हा निवड समिती बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना डावलले

काँग्रेसच्या जिल्हा निवड समिती बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना डावलले

प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार : सूचविलेली उमेदवारांची नावे वाद्यांत येण्याची शक्यता
गडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या पराभूत उमेदवार यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी या प्रकरणाची थेट तक्रार प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या बैठकीत समितीने निश्चित केलेल्या नावांवर आपला आक्षेप असल्याचे या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जिल्हास्तरावरून शिफारस झालेली नावे वाद्यांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१८ डिसेंबर रोजी गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर थेट नगराध्यक्ष व वार्डातील नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळाची बैठक ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना संजय वानखेडे व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून गतवेळी पराभूत झालेल्या उमेदवार सगुणा पेंटाजी तलांडी यांना बोलविण्यात आले नाही. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अ‍ॅड. रवींद्र दरेकर यांनाही निमंत्रीत करण्यात आले नाही. या तीन प्रमुख नेत्यांना डावलून बैठकीने परस्पर नाव निश्चित केले आहे. या नावांना आपला आक्षेप असल्याचे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे व गडचिरोलीच्या पराभूत काँग्रेस उमेदवार सगुणा तलांडी यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
येत्या २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा निवड समितीने निश्चित केलेल्या नावांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची निवड समिती मुंबई येथे बैठक घेऊन विचार विनिमय करणार होती. मात्र आता दोन जबाबदार पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या नावावर आक्षेप घेणारी लेखी तक्रार नोंदविल्याने या प्रकरणी प्रदेश काँग्रेसस्तरावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
प्रदेश काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. गणेश पाटील यांना विचारणा केली असता, मी सध्या बाहेर मुंबईतच आहे. काँग्रेसचे अखिल भारतीय उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या सभेची तयारी सुरू आहे. गडचिरोलीच्या निवडणुकीला वेळ आहे. ज्यावेळी उमेदवार निवडीची बैठक होईल. त्यावेळी या मुद्यावर लक्ष घातले जाईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress's District Selection Committee meeting held women office bearers