नामदेवराव उसेंडी यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा
By Admin | Updated: October 1, 2014 23:22 IST2014-10-01T23:22:52+5:302014-10-01T23:22:52+5:30
निवडणुकीचा माहोल तापायला सुरूवातच होताच गडचिरोली जिल्ह्याच्या काँग्रेसमध्येही दररोज प्रचंड भूकंप होऊ लागले आहे. दोन दिवसांपुर्वी नियुक्ती करण्यात आलेले जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष

नामदेवराव उसेंडी यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा
गडचिरोली : निवडणुकीचा माहोल तापायला सुरूवातच होताच गडचिरोली जिल्ह्याच्या काँग्रेसमध्येही दररोज प्रचंड भूकंप होऊ लागले आहे. दोन दिवसांपुर्वी नियुक्ती करण्यात आलेले जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष प्रकाश अर्जुनवार यांची आज गुरूवारी उचलबांगडी करीत त्यांच्या जागेवर गडचिरोलीचे मावळते आमदार डॉ. नामदेवराव दल्लुजी उसेंडी यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेस पक्षाची गडचिरोली जिल्ह्यात धुरा सांभाळणारे प्रभारी अध्यक्ष हसनअली गिलानी यांची सोमवारी पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी माजी खासदार मारोतराव कोवासे गटाचे ज्येष्ठ नेते प्रकाश अर्जुनवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. उसेंडी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. आज नामांकन पत्र परत घेण्याच्या वेळेपर्यंत पक्षाकडून अनेक नेत्यांनी डॉ. उसेंडी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत गळ घातली. डॉ. उसेंडी यांनी आपल्या समर्थकांचा शहरात मेळावाही शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आयोजित केला होता. हा सारा प्रकार सुरू असतांनाच दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. नामदेवराव उसेंडी यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. तर काँग्रेसचे जुने अध्यक्ष हसनअली गिलानी व प्रकाश अर्जुनवार यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
काँग्रेसने गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात दोन अध्यक्ष बदलविल्याने कार्यकर्त्यांमध्ये आज गोंधळाचे वातावरण होते. डॉ. उसेंडी यांच्या या नियुक्तीचे काँग्रेसच्या त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा बदल झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य गटातही आता याचे पडसाद पडतील, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)