काँग्रेसजन नगर पंचायतीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:26 IST2018-02-16T00:26:12+5:302018-02-16T00:26:37+5:30
नगर पंचायत क्षेत्रातील गरजू नागरिकांना घरकूल मंजूर करण्यात यावे, रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, तसेच पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, .....

काँग्रेसजन नगर पंचायतीवर धडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : नगर पंचायत क्षेत्रातील गरजू नागरिकांना घरकूल मंजूर करण्यात यावे, रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, तसेच पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आरमोरी तालुका काँग्रेसच्या वतीने माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात गुरूवारी आरमोरी नगर पंचायतीवर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला.
दुपारी २ वाजता या मोर्चाची सुरुवात माजी आ. गेडाम यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आली. सदर मोर्चा शहराच्या मुख्य बाजारपेठेतून निघून नगर पंचायतीवर पोहोचला. यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चाला संबोधित करताना माजी आ. गेडाम म्हणाले, न.पं. निवडणुकीवर काही लोकांनी स्थगीती आणल्यामुळे तीन वर्ष उलटूनही नगर पंचायतीची निवडणूक होऊ शकली नाही. लोकानियुक्त पदाधिकाऱ्यांविना हे नगर पंचायत वांजोटी असून शहराचा विकास रखडला आहे. शासन व प्रशासनाचे शहर विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
या मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर भातकुलकर, तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी, जि.प. सदस्य मनीषा दोनाडकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजीव गारोदे, पं.स. सभापती बबीता उसेंडी, माजी पं.स. सभापती अशोक वाकडे, प्रा. शशिकांत गेडाम, श्रीनिवास आंबटवार, चंदू वडपल्लीवार, राजू हस्तक, पं.स. सदस्य वृंदा गजभिये, सुभाष सपाटे आदी हजर होते.