काँग्रेस तीव्र आंदोलन करणार
By Admin | Updated: February 21, 2016 00:45 IST2016-02-21T00:45:47+5:302016-02-21T00:45:47+5:30
आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण आरमोेरी तालुक्यात भीषण दुष्काळ व नापिकीची परिस्थिती आहे.

काँग्रेस तीव्र आंदोलन करणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कार्यकर्ता मेळाव्यातील निर्णय
आरमोेरी : आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण आरमोेरी तालुक्यात भीषण दुष्काळ व नापिकीची परिस्थिती आहे. ५० टक्केपेक्षा कमी आणेवारी असतानाही एकही गाव दुष्काळाच्या यादीत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरमोरी तालुका काँग्रेसच्या वतीने २ मार्चला देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असा निर्णय शुक्रवारी आरमोरी येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्या मेळाव्यात घेण्यात आला.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर वनमाळी यांच्या अध्यक्षतेखाली आरमोरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. आनंदराव गेडाम, ज्येष्ठ नेते सुधीर भातकुलकर, माजी पं. स. सभापती परसराम टिकले, अंताराम ढोंगे, आनंदराव आकरे, केशव गेडाम, बग्गू ताडाम, चंदू वडपल्लीवार, पं. स. सदस्य इंदिरा मोहुर्ले, नम्रता टेंभूर्णे, महिला तालुकाध्यक्ष मंगला कोवे, वघाळाच्या सरपंच मनीषा दोनाडकर, श्रीनिवास आंबटवार, प्रा. शशिकांत गेडाम, मिलींद खोब्रागडे आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात आरमोरी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी या विषयावर ठराव घेण्यात आला. २ मार्चला देसाईगंज एसडीओ कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केले. (वार्ताहर)