भाजपच्या लाटेतही काँग्रेस स्थिर
By Admin | Updated: February 24, 2017 00:48 IST2017-02-24T00:48:38+5:302017-02-24T00:48:38+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजप २० जागा जिंकत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे.

भाजपच्या लाटेतही काँग्रेस स्थिर
भाजपला मिळाल्या २० जागा : १५ जागांवर काँग्रेस तर पाच जागांवर राकाँ विजयी
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजप २० जागा जिंकत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. तर भाजपच्या या झंझावतातही काँग्रेसने २०१२ पेक्षा एक जागा अधिक जिंकत आपले अस्तित्व स्थिर ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत मोठा तडाखा बसला असून राकाँच्या जागा १० वरून ५ वर आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी विधानसभा क्षेत्रात सात जागा जिंकत भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे आता सत्तेचे समीकरण जुळविण्याची भाजपला तयारी करावी लागणार आहे.
भाजपसोबत सहा जागांसाठी कोण मैत्री करतो, हे येणाऱ्या काळात दिसून येईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन सत्तास्थापन करून असा दावा करीत आहे. त्यामुळे सत्तेचा घोडेबाजार काही दिवसात तेजीत येईल, असे चित्र आहे.
धर्मरावबाबांसह राकाँलाही दणका
धर्मरावबाबा यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना पराभव पहावा लागला. त्यांच्या धाकट्या कन्या तनुश्री आत्राम मुलचेरा तालुक्यातून पराभूत झाल्या तर धर्मरावबाबांचे धाकटे बंधू रवींद्रबाबा आत्राम यांची कन्या नेहा आत्राम यांचा माजी आमदार दीपक आत्राम यांच्या पत्नीने पराभव केला. जगन्नाथराव आत्राम यांचे चिरंजीव रामेश्वर आत्राम हे ही अहेरी तालुक्यातून पराभूत झाले. मात्र धर्मरावबाबा आत्राम यांचे चिरंजीव हर्षवर्धनराव हे पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहे. तीन पराभव व दोन विजयाने धर्मरावबाबा आत्राम यांचे पारडे समसमान असल्याचे दिसून येत आहे. मात्र घराणेशाहीला मतदारांनी मोठी चपराक या निकालाने दिली. राकॉला आता आत्मचिंतनाची गरज आहे.