मानापुरात काँग्रेसने गड राखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:42 IST2018-04-08T00:42:12+5:302018-04-08T00:42:12+5:30
आरमोरी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे भवितव्य ठरविणाऱ्या मानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या किरण बंडू म्हस्के या विजयी झाल्या आहेत.

मानापुरात काँग्रेसने गड राखला
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे भवितव्य ठरविणाऱ्या मानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या किरण बंडू म्हस्के या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या उत्तरा प्रेमा लोनबले यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, या गणात यापूर्वीही काँग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या होत्या. काँग्रेसने गड राखल्याने सभापतीपदावरील संकट टळले आहे.
काँग्रेस किंवा भाजपा या दोन पक्षांपैकी ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, त्या पक्षाला बहुमताच्या जवळपास पोहोचता येत असल्याने दोन्ही पक्षांनी तगडे उमेदवार उभे करून निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी झोकून दिले होते. अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या किरण म्हस्के यांनी भाजपाच्या उत्तरा लोनबले यांचा ३० मतांनी पराभव केला. म्हस्के यांना २ हजार १८९ तर लोनबले यांना २ हजार १५९ मते मिळाली. किरण म्हस्के यांचा विजयी झाल्यानंतर माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष किशोर वनमाळी, रामभाऊ हस्तक, जि.प. सदस्य मनिषा दोनाडकर, पं.स. सभापती बबीता उसेंडी, बग्गु ताडाम, मंगला कोवे, अशोक वाकडे, वृंदा गजभिये, श्रीनिवास आंबटवार, विनोद बावणकर, वडपल्लीवार, नामदेव सोरते, दिघेश्वर धाईत, दीपक बेहरे, दत्तू सोमनकर, दिलीप घोडाम, मिलिंद खोब्रागडे, निलकंठ गोहणे, नरेंद्र टेंभुर्णे, जितेंद्र रामटेके, टिकेश कुमरे, पुंडलिक घोडाम, चिंतामन ढवळे, निलकंठ गोहणे, जीवन उसेंडी, नरेंद्र गजभिये यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.