काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली

By Admin | Updated: February 2, 2017 01:20 IST2017-02-02T01:20:14+5:302017-02-02T01:20:14+5:30

२०१२ मध्ये भामरागड तालुक्यात रुग्णवाहिकेतून साहित्य व शस्त्रसाठा घेऊन जात असल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले

The Congress party rejected the candidature | काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली

काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली

 पोर्लात काँग्रेसचे उमेदवारच नाहीत : मल्लेलवार अपक्ष म्हणून मैदानात उतरले
गडचिरोली : २०१२ मध्ये भामरागड तालुक्यात रुग्णवाहिकेतून साहित्य व शस्त्रसाठा घेऊन जात असल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले बंडोपंत मल्लेलवार यांना वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेरीस मल्लेलवार व त्यांच्या दोन पंचायत समितीच्या सहकारी उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची पाळी आली आहे. आपण राष्ट्रीय समाज पक्षाकडून पोर्ला-वसा क्षेत्रातून निवडणूक लढणार असल्याचे बंडोपंत मल्लेलवार यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेतून जाहीर केले आहे. मल्लेलवार यांना काँग्रेसने वसा-पोर्ला क्षेत्रातून उमेदवारी नाकारली असली तरी या क्षेत्रात काँग्रेसने कुणालाही उमेदवारी दिलेली नाही, हे विशेष.
या घटनेमुळे मागील ४० वर्षांपासून मल्लेलवारांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी असलेला ऋणानुबंध तुटला आहे. जिल्हानिर्मितीपासून काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते असलेले बंडोपंत मल्लेलवार हे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून सदस्य होते. मधल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एक पराभव वगळता बंडोपंत मल्लेलवार जिल्हा परिषदेच्या राजकारणात नेहमीच सक्रीय राहिले. २०१२ मध्ये ते मौशीखांब-मुरमाडी मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठ्याचे हे प्रकरण घडले. हे प्रकरण सध्या गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणाच्या काळात तीन बैठकांना अनुपस्थित राहिले म्हणून मल्लेलवार यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्त नागपूर यांनी रद्द केले होते. त्यानंतर मौशीखांब-मुरमाडी जि. प. क्षेत्रात पोटनिवडणूक होऊन त्यात भाजपचा उमेदवार निवडून आला होता. आता जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्यावर मल्लेलवार यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. जिल्हा निवड समितीने मल्लेलवार यांना वसा-पोर्ला मतदार संघातून उमेदवारी द्यावी म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीकडे शिफारस केली होती. जिल्हा निवड समितीच्या शिफारशीनंतर छाननी समितीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या समोरही मल्लेलवार यांचे नाव उमेदवारीसाठी ठेवण्यात आले होते.
तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संसदीय समितीसमोर मल्लेलवारांच्या उमेदवारीवर वादळी चर्चा झाली. मल्लेलवारांना उमेदवारी दिल्यास पक्षाची बदनामी होईल, विरोधक हा प्रचाराचा मुद्दा करतील. राज्यपातळीवरही पक्षाची अडचण यामुळे होऊ शकते, ही बाब प्रदेश काँग्रेसच्या निदर्शनास मल्लेलवार विरोधकांनी आणून दिली. यावेळी माजी खा. विलास मुत्तेमवार यांनी मल्लेलवारांच्या नक्षल संबंधाच्या प्रकरणाचा उल्लेख केला होता. त्यामुळे छाननी समितीने नंतर मल्लेलवार यांना काँग्रेसकडून उमेदवारी देऊ नका, अशी भूमिका घेतली व मल्लेलवारांची उमेदवारी कापली.
मंगळवारी वसा व पोर्ला पंचायत समिती गणाच्या उमेदवारांना काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म उशिरा देण्यात आले. मात्र बंडोपंत मल्लेलवारांना उमेदवारी देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या होत्या, अशी माहिती आहे. दरम्यान मंगळवारी दिवसभर मल्लेलवार मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडे आपली बाजू मांडण्यासाठी आ. विजय वडेट्टीवार यांच्या समावेत गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. मात्र त्यानंतरही प्रदेश काँग्रेस कमिटीकडून मल्लेवारांच्या उमेदवारीला हिरवी झेंडी मिळाली नाही. अखेरीस बुधवारी मल्लेलवारांनी स्वत: अपक्ष उमेदवार म्हणून वसा-पोर्ला मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काँग्रेसने पोर्ला पं. स. गणातून उमेदवारी दिलेले विलास केशव दशमुखे व वसा गणाच्या उमेदवार पुष्पलता मोहन जेंगठे यांनीही काँग्रेसची उमेदवारी नाकारली व जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्याकडे एबी फॉर्म परत नेऊन दिले. ते ही मल्लेलवारांसमावेत आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मात्र काँगे्रसने या क्षेत्रातून कुणालाही उमेदवारी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The Congress party rejected the candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.