काँग्रेसने जिल्ह्यात तीन तालुका अध्यक्ष बदलविले
By Admin | Updated: July 28, 2016 01:55 IST2016-07-28T01:55:25+5:302016-07-28T01:55:25+5:30
आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने पक्ष संघटन बांधणीचे काम हाती घेतले आहे.

काँग्रेसने जिल्ह्यात तीन तालुका अध्यक्ष बदलविले
गडचिरोली : आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने पक्ष संघटन बांधणीचे काम हाती घेतले आहे. काँग्रेसच्या प्रदेश निरीक्षक पदावर सुरेश भोयर व डॉ. भगत यांची नियुक्ती झाल्यानंतर आता पक्षाने चामोर्शी, देसाईगंज व कुरखेडा येथील जुन्या तालुका काँग्रेस अध्यक्षांची उचलबांगडी करून नवे तालुका अध्यक्ष नियुक्त केले आहेत. देसाईगंज येथील तालुका अध्यक्ष विलास ढोरे यांची उचलबांगडी करून तेथे पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले यांची नियुक्ती केली आहे. चामोर्शीचे तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर यांच्या जागी निशांत नैताम यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर कुरखेडा येथे जयंत हरडे यांच्याकडे तालुका अध्यक्ष पदाची धूरा सोपविण्यात आली आहे. या नियुक्त्या झाल्या असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी लोकमतशी बोलताना दिली. विलास ढोरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव रवींद्र दरेकर यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांची उचलबांगडी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर राजेश ठाकूर हे माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या गटाचे मानले जातात. त्यांची उचलबांगडी करून कोवासे यांचेच अत्यंत निकटवर्तीय निशांत नैताम यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर कुरखेडा येथील तालुका काँग्रेसचे जुने अध्यक्ष भाजपवासी झाल्याने त्यांच्या जागी जयंत हरडे यांची नेमणूक माजी आमदार आनंद गेडाम यांच्या कोट्यातून झाली आहे.