नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे पारडे जड

By Admin | Updated: December 1, 2015 05:36 IST2015-12-01T05:36:01+5:302015-12-01T05:36:01+5:30

दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यात चार नगर पंचायतीच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या. यात काँग्रेसला

Congress general secretary | नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे पारडे जड

नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे पारडे जड

सिरोंचा व कुरखेडात अभद्र युती : भाजप-सेनेला प्रत्येकी एक तर काँग्रेसचे दोन नगराध्यक्ष
गडचिरोली : दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यात चार नगर पंचायतीच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या. यात काँग्रेसला दोन नगराध्यक्ष व दोन उपाध्यक्ष पद मिळाले. तर शिवसेना व भाजपच्या वाट्याला प्रत्येकी एक नगराध्यक्ष पद आले. कुरखेडा येथे काँग्रेस, शिवसेना व सिरोंचा येथे काँग्रेस, भाजप अशी अभद्र युतीही झाली. भामरागडात काँग्रेस-राकाँ आघाडीने नगर पंचायतीवर कब्जा केला. कुरखेडा नगर पंचायतीवर शिवसेनेचे डॉ. महेंद्र मोहबंशी नगराध्यक्ष पदी निवडून आले. तर सिरोंचा येथे भाजपचे राजू पेदापल्लीवार निवडून आले आहे. चामोर्शी नगर पंचायतीवर काँग्रेसने आपली निर्विवाद सत्ता प्रस्तापित केली आहे. येथे जयश्री पंकज वायलालवार १२ मते मिळवून निवडून आल्या आहेत. भामरागड येथेही काँग्रेसचे राजू वड्डे नगराध्यक्ष पदी विराजमान झाले आहे.

कुरखेडात सेना-काँग्रेसची युती
कुरखेडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व अपक्ष अशी आघाडी झाली. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. महेंद्र नानाजी मोहबंशी यांना ९ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार मोहम्मद कलाम पिर मोहम्मद शेख यांना ८ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री लालचंद धाबेकर यांना ९ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना भिमराव वालदे यांना ८ मते मिळाली. या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे यांनी काम पाहिले. तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार गुंफावार उपस्थित होते.
चामोर्शीत काँग्रेसचाच बोलबाला
चामोर्शीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री पंकज वायलालवार यांनी भाजपच्या कविता दिलीप किरमे यांचा पराभव केला. जयश्री वायलालवार यांना १२ तर कविता किरमे यांना ५ मते मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार मैदानात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रज्ञा धिरज उराडे व शिवसेनेच्या नगरसेवक मंजुषा निमाई रॉय यांनीही काँग्रेसच्या वायलालवार यांनाच मतदान केले. उल्लेखनिय बाब म्हणजे उराडे नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असूनही त्यांनी काँग्रेसला मदत केली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे राहूल नैताम यांनी भाजपचे प्रशांत येगलोपवार यांचा पराभव केला. राहूल सुखदेव नैताम यांना १० तर प्रशांत येगलोपवार यांना ७ मते मिळाली. काँग्रेसचे राहूल नैताम तीन मतांनी विजयी झाले. राकाँच्या प्रज्ञा उराडे व शिवसेनेच्या मंजुषा रॉय यांनी उपाध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान केले. या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. याप्रसंगी सुखदेव नैताम, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश ठाकूर, जयसूख दोशी, चंद्रकांत दोशी, वैभव भिवापुरे, विनोद खोबे, नितीन वायलालवार, निशांत नैताम, अशोक तिवारी, दिवाकर झलके, महेश येलावार, तपन दोशी, पंकज वायलालवार, विशेष दोशी, किशोर दोशी, सोपान नैताम, रमेश नैताम, माणिकराव तुरे, हरबा शेख, संतोष पालारपवार, किशोर दोशी, महेश मारकवार, सतिश पुठ्ठावार, मधुकर बोदलकर, माजी सरपंच मालन बोदलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, सह पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार यु. जी. वैद्य, निवडणूक नायब तहसीलदार एस. के. चडगुलवार यांनी काम पाहिले.
सिरोंचात भाजप-काँग्रेसमध्ये युती
सिरोंचा नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदी भाजपचे राजू धर्मय्या पेदापल्ली विजयी झाले आहे. तर उपाध्यक्ष पदी काँग्रेसच्या पठाण मुमताज बेगम हुसेनखान निवडून आल्या आहेत. पेदापल्ली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवीकुमार चंद्रय्या रालबंडी यांचा नगराध्यक्ष पदासाठी पराभव केला. रालबंडी यांना ८ मते मिळाली तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राकाँचे सतिश सडवली भोगे पराभूत झाले. पठाण यांनी त्यांचा एक मतांनी पराभव केला. या नगर पंचायतीत भाजपला सहा, काँग्रेसला तीन, राकाँला पाच, दोन अपक्ष व एक आविसला जागा मिळाली होती. काँग्रेस-राकाँ आघाडीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांविरोधात व्यक्तीगत स्तरावर जाऊन विखारी प्रचार केल्याने तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल रहीम यांचा पराभव करून राकाँचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रालबंडीवार हे निवडून आल्याने त्यांना समर्थन देण्यात काँग्रेसला अडचण होती. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी राकाँसोबत आघाडी करण्याच्या भूमिकेला विरोध करीत भाजपला साथ देणे पसंत केले, अशी चर्चा स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आहे.
भामरागडात नाट्यपूर्ण घडामोडीनंतर काँग्रेस-राकाँत आघाडी
१७ सदस्यीय भामरागड नगर पंचायतीत भाजपला सात, काँग्रेस सहा व राकाँला चार जागा मिळाल्या आहे. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून राजू बंडू वड्डे, भाजपकडून कविता सिडाम व राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी श्रीकांत मोडक अशा तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सोमवारी मतदान झाल्यानंतर काँग्रेसचे राजू बंडू वड्डे यांना १० मते मिळाली. भाजपच्या कविता सिडाम यांना शुन्य तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी श्रीकांत मोडक यांना ७ मते मिळाली. नगराध्यक्ष पदी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू वड्डे हे निवडून आले आहेत. तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शारदा कंबगोनीवार निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या कविता सिडाम यांचा १० विरूध्द ७ मतांनी पराभव केला. अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडीनंतर येथे काँग्रेस-राकाँची सत्ता अबांधित राखण्यात यश आले.

Web Title: Congress general secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.