जि.प.मध्ये काँग्रेस आघाडीचे वर्चस्व
By Admin | Updated: October 3, 2014 01:31 IST2014-10-03T01:31:33+5:302014-10-03T01:31:33+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक गुरूवारी पार पडली.

जि.प.मध्ये काँग्रेस आघाडीचे वर्चस्व
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक गुरूवारी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर गट, आविस (आ. दीपक आत्राम गट), नाग विदर्भ आंदोलन समिती अशी मोर्चेबांधणी केली होती. या आघाडीला ४ पैकी ३ सभापती पद पटकाविण्यात यश आले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित चंदेल गट व भाजप सदस्यांच्या आघाडीला केवळ एकच सभापती पद पदरात पाडून घेता आले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस व चंदेल गटाला जोरदार तडाखा बसला आहे.
जिल्हा परिषदेत समाज कल्याण सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे मनोहर पाटील पोरेटी यांचा राकाँ आघाडीकडून रिंगणात असलेले अपक्ष सदस्य विश्वास भोवते यांनी पराभव केला. मनोहर पोरेटी यांना २३ मते मिळाली. तर विश्वास भोवते यांना २४ मते मिळाली. या निवडणुकीत राकाँ बंडखोर शारदा मंदा शंकर व शिवसेनेच्या सदस्य कुसूम रणदिवे तटस्थ राहिल्या. महिला व बालकल्याण सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीकडून उभ्या असलेल्या नाविसच्या सुवर्णा खरवडे विजयी झाल्या आहेत.
खरवडे यांनी भाजपच्या बंडखोर सदस्य जयमाला पेंदाम यांचा पराभव केला. सुवर्णा खरवडे यांना २५ मते मिळाली. तर जयमाला पेंदाम यांना २४ मतांवर समाधान मानावे लागते. इतर दोन विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे, राष्ट्रवादी काँग्रेस फुटीर गटाचे अतुल गण्यारपवार, भाकपचे अमोल मारकवार, आदिवासी विद्यार्थी संघ (आ. दीपक आत्राम गटाचे) अजय कंकडालवार, चंदेल गटाच्या निरांजनी चंदेल यांच्यात लढत झाली.
या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाचे सदस्य अतुल गण्यारपवार हे इश्वर चिठ्ठीने विजयी झालेत. त्यांनी राकाँ आघाडीकडून मैदानात असलेल्या सुरेंद्रसिंह चंदेल गटाच्या जि.प. सदस्य निरांजनी चंदेल यांचा पराभव केला.
गण्यारपवार व चंदेल यांना प्रत्येकी २४ मते मिळाली. इश्वरचिठ्ठीच्या निकालाने गण्यारपवार विजयी झाले. यावेळी भाकपचे सदस्य अमोल मारकवार यांना एकमत मिळाले. तर अन्य एका विषय समिती सभापती निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडून रिंगणात असलेले आदिवासी विद्यार्थी संघाचे सदस्य (आ. दीपक आत्राम गट) अजय कंकडालवार निवडून आले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जि.प. सदस्य डॉ. तामदेव दुधबळे यांचा पराभव केला. कंकडालवार यांना २५ मते मिळाली. तर डॉ. दुधबळे यांना २३ मतांवर समाधान मानावे लागले. ५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीला आज ४९ सदस्य उपस्थित होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बंडोपंत मल्लेलवार व नाविसच्या सदस्य राणी रूख्मीणीदेवी सत्यवानराव आत्राम गैरहजर होत्या. आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात दोन सभापती पद मिळाले आहे. तर गडचिरोली विधानसभा क्षेत्राला २ सभापती पद आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रे्रस पक्षाला आजच्या निवडणुकीत जोरदार तडाखा बसला असून अहेरी विधानसभा क्षेत्रात नाविस व आविसने सभापती पद मिळविल्याने दोनही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह संचारल्याचे दिसून आले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी काम पाहिले. जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीदरम्यान जिल्हा परिषदेच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
(स्थानिक प्रतिनिधी)