काँग्रेस करणार जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर दावा
By Admin | Updated: September 16, 2014 23:42 IST2014-09-16T23:42:55+5:302014-09-16T23:42:55+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेत १३ सदस्य असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका राहणार आहे. काँग्रेसच्या समर्थनाशिवाय कोणत्याही गटाचे

काँग्रेस करणार जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर दावा
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत १३ सदस्य असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका राहणार आहे. काँग्रेसच्या समर्थनाशिवाय कोणत्याही गटाचे सत्तेचे समिकरण जुळणे कठीण असल्याने काँग्रेसचे महत्व वाढलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २० सप्टेंबर रोजी पक्ष निरिक्षक म्हणून विधान परिषद सदस्य आमदार हरिभाऊ राठोड यांची नियुक्ती केली आहे व आमदार राठोड हे गडचिरोली येऊन पक्षाच्या सदस्यांशी चर्चा करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदावर आपला दावा ठेवणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना सांगितले.
गडचिरोली जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. मल्लेलवार सध्या कारागृहात असल्याने ते रजेवर आहेत. त्यामुळे १२ सदस्य प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. विद्यमान स्थितीत काँग्रेसच्या पाच सदस्यांना अन्य राजकीय पक्षाच्या लोकांनी पर्यटनासाठी नेलेले आहे. सात सदस्यांचा गट सध्या मजबूतपणे उभा आहे. काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी स्थानिक गटातटाचा विचार न करता पक्षहित लक्षात घेऊन या निवडणुकीत मतदान करायचा, असा निश्चय केला आहे व काँग्रेस अध्यक्ष पदावर आपला दावा सांगणार आहे. काँग्रेसकडे अध्यक्ष पदासाठी जीवनपाटील नाट, लंकेश भोयर, पुनम गुरनुले व सरिता भोयर या जिल्हा परिषद सदस्य ओबीसी प्रवर्गातून दावेदार आहेत. स्थानिक गटातटाचा विचार केला तर या नावांना विरोध होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन आपण सारे काँग्रेसचे पाईक आहोत. ही भूमिका पक्षाच्या सातही सदस्यांनी घेतली आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. अध्यक्ष पद जो देईल त्यालाच समर्थन द्यायचे, असा निर्णय हे सदस्य घेण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असल्यामुळे नेमक्या कोणत्या गटाशी हातमिळवणी करायची यावरही निरिक्षक या सदस्यांची मते जाणून घेणार आहे. गेल्या अडीच वर्षात सत्तेवर असलेल्या राकाँच्या अध्यक्षांनी आपल्याला उपेक्षची वागणूक दिली. ही भावना या सर्वांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागली असून काँग्रेसच्या भूमिकेवर अनेकांचे लक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस सदस्यांचे महत्व आता वाढले आहे. निरिक्षक या संदर्भात अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांनाी दिली आहे.