अहेरी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:22 IST2017-02-27T01:22:31+5:302017-02-27T01:22:31+5:30
अहेरी आणि भामरागड तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहे.

अहेरी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम
मोठा हादरा : भामरागड व अहेरी तालुक्यातील पराभूत उमेदवारांचा समावेश
अहेरी : अहेरी आणि भामरागड तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी व भामरागड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकही बैठक घेतली नाही, प्रचार दौरा केला नाही, सभा घेतली नाही, पदाधिकाऱ्यांची साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत असणाऱ्या नेते व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
२६ फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, उपाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्याकडे पाठविले आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गावडे, अहेरी तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष उषा आत्राम, अनुसूचित जाती सेलचे अहेरी तालुका अध्यक्ष सामप्रसाद मुंजमकर, काँग्रेसचे जि.प. उमेदवार लैजा बालाजी गावडे, लक्ष्मी रामचंद्र उरेत, भगवान मंगा मडावी, सुरेश समय्या सोयाम, बुज्जीताई पोशांना तोरेम, मनिषा तुंगलवार, भामरागडचे राजू मुरा आत्राम, जेनी पुसू पुंगाटी, बेबी केशव परसा यांचा समावेश आहे.
हे पदाधिकारी व उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढले. त्यांना पक्षाकडून कोणतीही प्रचार सामुग्री देण्यात आली नाही. पक्षाचा कोणताही नेता त्यांच्यांशी संवाद साधण्यासाठी गेला नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून काँग्रेस पक्षात असूनही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा अहेरी, भामरागड तालुक्यात दारूण पराभव झाला, असे सांगून त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. (शहर प्रतिनिधी)