यंदा कोसा उत्पादकांवर संक्रांत
By Admin | Updated: January 14, 2015 23:07 IST2015-01-14T23:07:32+5:302015-01-14T23:07:32+5:30
पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या तीन जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून ढिवर समाजाचे जवळपास ३ हजार कुटुंब वंशपरंपरेने टसर कोसा उत्पादन करून आपला उदरनिर्वाह करीत आहे.

यंदा कोसा उत्पादकांवर संक्रांत
उत्पादन घटले : अवकाळी पाऊस व कडाक्याच्या थंडीचा परिणाम
वैरागड : पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या तीन जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून ढिवर समाजाचे जवळपास ३ हजार कुटुंब वंशपरंपरेने टसर कोसा उत्पादन करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. मात्र अस्मानी संकटामुळे यंदा रेशीम टसर शेती धोक्यात आली आहे. अवकाळी पाऊस व कडाक्याच्या थंडीमुळे यंदा कोसा उत्पादनात कमालीची घट झाली आहे.
टसर रेशीम एन्थेरिया माईविटा या किटकापासून प्राप्त होणारे रेशीम आहे. या प्रजातीच्या किटकाचे खाद्य अर्जुन, एन, बोर आदी झाडांची पाने आहेत. टसर अळी पूर्ण विकसीत होण्याच्या म्हणजे अंडी, अळी, कोष, फुलपाखरू आदींची निर्मिती होण्याच्या काळात अवकाळी पाऊस जिल्ह्यात बरसला. तसेच गेल्या महिन्याभरापासून जिल्हाभरात कडाक्याची थंडी पडत आहे. अशा वातावरणामुळे अंडीपूज तयार होत नाही. तसेच नवजात अळ्या बाहेर पडत नाही. अंडीपासून पतंग तयार होईलपर्यंतचा हा पंधरा दिवसांचा काळात योग्य नैसर्गिक वातावरण असणे आवश्यक आहे. मात्र थंडीमुळे कालावधी वाढून कोसाची अवस्था खुंटली, अशी माहिती कोसा उत्पादक शेतकऱ्यांकडून मिळाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोसा उत्पादक शेतकरी साधारणत: दोनवेळा पिके घेतात. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसा उत्पादन घेण्याच्या कालावधीत अवकाळी पाऊस बरसला. तसेच कडाक्याची थंडी, दाट धुके यामुळे कोसा उत्पादनात घट झाली, अशी माहिती मेंढेबोडी येथील कोसा उत्पादक मारोती कांबळे, ऋषी भोयर, पुंडलिक भोयर, रेवनाथ मेश्राम, सभा कांबळे, चरण मुंगीकोल्हे, पत्रू कोल्हे, तुळशीराम गेडाम आदी शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. (वार्ताहर)