संगणक परिचालकांना ग्रा. प. सेवेत सामावून घ्या
By Admin | Updated: October 22, 2014 23:18 IST2014-10-22T23:18:13+5:302014-10-22T23:18:13+5:30
अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड तालुक्यातील ग्रा. प. अंतर्गत मागील तीन वर्षापासून संगणक परिचालक पदावर जिल्हा परिषदेतर्फे ८ हजार ८०० मासिक वेतनावर परिचालकाची

संगणक परिचालकांना ग्रा. प. सेवेत सामावून घ्या
अहेरी : अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड तालुक्यातील ग्रा. प. अंतर्गत मागील तीन वर्षापासून संगणक परिचालक पदावर जिल्हा परिषदेतर्फे ८ हजार ८०० मासिक वेतनावर परिचालकाची नियुक्ती करण्यात आली. परंतु संगणक परिचालकांना अत्यल्प वेतन मिळत असल्याने संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी अहेरी उपविभागातील संगणक परिचालकांनी केली आहे.
तीन वर्षापूर्वी महाआॅनलाइन कंपनीमार्फेत संगणक परिचालकांनी कंत्राटी पद्धतीने संगणक परिचालक म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात काम देण्यात आले. संगणक परिचालकांना प्रत्यक्षात मात्र ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रूपयांपर्यत पगार दिला जात आहे. संगणक परिचालकांंच्या कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्याने कामाच्या तुलनेत पगार अत्यल्प आहे. ८ हजार ८०० रूपये मिळतील या आशेने अनेक युवकांनी कंत्राटी पद्धतीची नोकरी स्वीकारली. परंतु संगणक परिचालकांना ४ हजार रूपयांपर्यंतच वेतन दिले जात आहे. महाआॅनलाइन कंपनीमार्फत माहे जुलैपासून प्रत्येक महिन्याला ४५० डाटाएन्ट्री करणे अनिवार्य केले. परंतु अहेरी तालुक्यातील प्रत्येक ग्रा. प. ची लोकसंख्या १ हजार ते ३०० च्या घरात असल्याने दर महिन्याला ४५० नोंदी उपलब्ध होऊ शकत नाही. नोंदीनुसार आॅपरेटरांना वेतन मिळेल अशी ग्वाही देण्यात आली होती. परंतु आॅगस्ट २०१४ मध्ये प्रत्येक संगणक परिचालकांना २ हजार ५०० प्रमाणे मासिक वेतन देण्यात आले. त्यामुळे संगणक परिचालकांवर अन्याय होत आहे. सुरूवातीस पदावर रूजू होतांना जनगणनेच्या कामाकरीता दर व्यक्ती २१ रूपये प्रमाणे मोबदला देण्याचे मान्य केले होते. परंतु याचा फायदा परिचालकांना देण्यात आला नाही. प्रशासनाने संगणक परिचालकांना मासिक ८ हजार ८०० रूपये प्रमाणे वेतन द्यावे किंवा ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून १०० टक्के सेवेत सामावून घ्यावे, अन्यथा संगणक परिचालकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विलास दुर्गे, दिनेश आत्राम, भैय्याजी दब्बा, विनोद सदनपवार, मृणालीनी खोब्रागडे, सत्यनारायण दहागावकर, भाग्यश्री दोंतुलवार, श्रृती मोनकुरवार, मनेश वाघाडे, शंकर गोगले, पूजा चक्रमवार, प्रभाकर दुर्गे यांनी केली आहे.