पॅनकार्ड सक्तीचा निषेध
By Admin | Updated: January 19, 2016 01:17 IST2016-01-19T01:17:59+5:302016-01-19T01:17:59+5:30
केंद्र सरकारने सोना, चांदी या दागिण्यांची खरेदी- विक्री करण्याकरिता सराफा व्यावसायिकांना पॅनकार्ड सक्तीचे केले आहे.

पॅनकार्ड सक्तीचा निषेध
गडचिरोली : केंद्र सरकारने सोना, चांदी या दागिण्यांची खरेदी- विक्री करण्याकरिता सराफा व्यावसायिकांना पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. या निर्णयामुळे व्यापारावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याने सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शहरातील सराफा बाजारातून इंदिरा गांधी चौकात सराफा असोसिएशनच्या वतीने कँडलमार्च काढण्यात आला.
या कँडलमार्चच्या माध्यमातून सराफा असोसिएशनचे पदाधिकारी व उपस्थित व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या या नव्या धोरणाचा निषेध केला. यावेळी सराफा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर बोगुजवार, उपाध्यक्ष नंदू वाईलकर, सचिव नितीन हर्षे, जिल्हा कोषाध्यक्ष नितीन चिमडलवार, गडचिरोली शहर अध्यक्ष गजानन येनगंधलवार, सुधाकर येनगंधलवार, शहर सचिव सुरेश भोजापुरे, सचिन हर्षे, सुधाकर मुनगंटीवार, संजय देवोजवार, अनिल देवोजवार, श्रीकांत डोमळे, कुणाल नागरे, प्रकाश शिवणकर, अनिल करपे, कुमोद वाईलकर, कुमोद बोबाटे, विनोद बोबाटे, नरेंद्र बोगुजवार, शिवाजी पवार, मारोती भांडेकर, राकेश हेमके, संजय हर्षे आदींसह अनेक सराफा व्यावसायिक उपस्थित होते. इंदिरा गांधी चौकात कँडलमार्च पोहोचल्यानंतर तेथील चबुतऱ्यावर कँडल ठेवून या मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
खासदारांची घेतली भेट
४सोना- चांदी खरेदी- विक्रीसाठी केंद्र सरकारने पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कँडलमार्चपूर्वी सकाळी खा. अशोक नेते यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले.