कॉम्प्लेक्समधील पाणी पुरवठा बंद
By Admin | Updated: June 29, 2015 02:05 IST2015-06-29T02:05:37+5:302015-06-29T02:05:37+5:30
शहरातील कॉम्प्लेक्स भागातील शासकीय निवासस्थाने असलेल्या परिसराचा पाणी पुरवठा मागील सहा दिवसांपासून बंद पडला आहे.

कॉम्प्लेक्समधील पाणी पुरवठा बंद
गडचिरोली : शहरातील कॉम्प्लेक्स भागातील शासकीय निवासस्थाने असलेल्या परिसराचा पाणी पुरवठा मागील सहा दिवसांपासून बंद पडला आहे. मात्र नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
कॉम्प्लेक्स परिसरात शेकडो शासकीय निवासस्थाने आहेत. या निवासस्थानासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी नगर परिषदेच्या मार्फत तयार करण्यात आली आहे. या ठिकाणच्या पाईपलाईनमध्ये सहा दिवसांपूर्वी अचानक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे तेव्हापासून या परिसरात पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प पडला आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी तसेच पाणी पुरवठा सभापती संजय मेश्राम यांनी मुख्याधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांना फोन करून या बद्दलची माहिती दिली. मात्र अजूनपर्यंत कलेक्टर कॉलनी व सोनापूर या दोन्ही ठिकाणचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही.
ऐन पावसाळ्यात नागरिकांना विहीर व हातपंपाचे पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेच्या या कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. यातील बिघाड शोधून काढून पाणी पुरवठा नियमित करावा, अन्यथा नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. यापूर्वीही शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा ठप्प पडला होता. मात्र नागरिकांची ओरड सुरू झाल्यानंतर तत्काळ पाणी पुरवठा सुरू केला. या परिसरात नेहमीच कमी पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे सुध्दा नागरिक त्रस्त आहेत. नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)