राष्ट्रीय महामार्ग पॅकेज कार्यक्रमातून पूर्ण होणार
By Admin | Updated: October 14, 2014 23:17 IST2014-10-14T23:17:57+5:302014-10-14T23:17:57+5:30
महाराष्ट्र-छत्तीसगड-आंध्र प्रदेश राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ चे काम मागील दोन तपापासून रखडले आहे. या महामार्गाचे काम पॅकेज सिस्टीम अंतर्गत केंद्र सरकारचा भूपृष्ठ वाहतूक विभाग

राष्ट्रीय महामार्ग पॅकेज कार्यक्रमातून पूर्ण होणार
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड-आंध्र प्रदेश राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ चे काम मागील दोन तपापासून रखडले आहे. या महामार्गाचे काम पॅकेज सिस्टीम अंतर्गत केंद्र सरकारचा भूपृष्ठ वाहतूक विभाग मार्गी लावणार असल्याचे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.
आंध्र प्रदेश-छत्तीसगड या तीन राज्यांना जोडणाऱ्या निजामाबाद ते जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ चे काम सन २००० मध्ये बीआरओ मार्फत सुरू करण्यात आले. १४ वर्षाचा कालावधी लोटूनही हे काम अपूर्ण आहे. दरम्यान, बीआरओ येथून परत गेले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले.
राज्यात सिरोंचा तालुक्यात सिरोंचा ते पातागुडम हे ५७.३०० किमी अंतर आहे. त्यात रस्ते व नाल्यावरील पूल याचे काम होते. आतापर्यंत ३३ किमीचे काम पूर्ण झाले आहे. अजून २४.३०० किमीचे काम अपूर्ण आहे. सदर २४.३०० किमीचे काम वन विभागाची नक्त मालमत्ता रक्कम (एनपीव्ही) भरण्यासाठी रोखण्यात आले होते. चार वर्षानंतर वन विभागाची एनपीव्ही रक्कम २१ कोटी भरणा करण्यात आली. सदर काम पूर्ण होण्याच्या आधीच अपूर्ण अवस्थेत काम सोडून बीआरओ गेल्याने हे काम रखडूनच आहे.
आंध्र प्रदेशात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ चे २७-३०० किमीच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. यात पाच किमीचे काम अपूर्ण आहे. छत्तीसगड राज्यात भोपालपटणम ते जगदलपूर २३० किमीचे काम सुरू होते. त्यात ६० किमीचे काम अपूर्ण आहे. या कामाबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने काम वेळेवर पूर्ण केले नाही म्हणून संबंधित यंत्रणेवर कारवाईचा अहवाल तयार केला होता. मात्र विद्यमान केंद्र सरकारने या कारवाईला स्थगिती देऊन आता सदर रखडलेले काम पॅकेज सिस्टीमनुसार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. रखडलेल्या कामाचे अडीच अडीच कोटी रूपयांचे पॅच पाडून सदर काम स्थानिक कंत्राटदारांकडून पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या कामाला गती मिळेल व वेळेत काम पूर्ण होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. १४ वर्षांपासून हे काम रखडले असल्यामुळे आता या कामाला गती येण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)