जलसंधारणाची केवळ ७२७ कामे पूर्ण
By Admin | Updated: April 18, 2015 01:38 IST2015-04-18T01:38:43+5:302015-04-18T01:38:43+5:30
पाणी टंचाई निर्मुलन आणि जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

जलसंधारणाची केवळ ७२७ कामे पूर्ण
गडचिरोली : पाणी टंचाई निर्मुलन आणि जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १५२ गावांची निवड करण्यात आली. या गावात एकूण चार हजार ११८ जलसंधारणाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला. १७ एप्रिलपर्यंत १२८ गावात जलसंधारणाची ७२७ कामे पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, वन, जिल्हा परिषद (सिंचाई), पंचायत समिती, लघु सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलसंधारणाची कामे करावयाची आहेत. कृषी विभागामार्फत ७२ गावातील ६६५ कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली असून १३० कामे सुरू आहेत. पंचायत समितीमार्फत ६७ गावातील ४८ कामे पूर्ण झाली असून १७१ कामे सुरू आहेत. वन विभागामार्फत ३६ गावातील १० कामे पूर्ण झाले असून ५० काम सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत ३३ गावातील केवळ चार कामे पूर्ण झाले असून ६९ कामे सुरू आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध विभागामार्फत जिल्ह्यात मजगी, माती नाला बांधणे व दुरूस्ती, सिमेंट नाला दुरूस्ती, शेततळे, बोळी दुरूस्ती नुतनीकरण, वनतलाव, खोदतळे, मामा तलाव, गाव तलाव दुरूस्ती, साठवण बंधारा, सिंचन विहिर आदी कामांवर विविध विभागामार्फत १७ एप्रिलपर्यंत एकूण आठ कोटी ८१ लाख ६१ हजार रूपये खर्च झाला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची आराखड्यातील सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावयाची आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)