आरमोरीत कुटुंबकल्याण उद्दिष्ट पूर्ण
By Admin | Updated: April 5, 2015 01:53 IST2015-04-05T01:53:49+5:302015-04-05T01:53:49+5:30
जिल्हाभरात मागील वर्षात मातामृत्यूच्या २२ घटना घडल्या. मात्र आरमोरी तालुक्यात एकाही मातेचा मृत्यू प्रसूतीदरम्यान झाला नाही.

आरमोरीत कुटुंबकल्याण उद्दिष्ट पूर्ण
वैरागड : जिल्हाभरात मागील वर्षात मातामृत्यूच्या २२ घटना घडल्या. मात्र आरमोरी तालुक्यात एकाही मातेचा मृत्यू प्रसूतीदरम्यान झाला नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत तालुक्याने राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात १०० टक्के उद्दिष्टप्राप्त केले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश मोटे यांनी दिली आहे.
मानव विकास मिशन अंतर्गत वडधा येथे सात, वैरागड येथे तीन, भाकरोंडी येथे तीन, देलनवाडी येथे तीन अशा एकूण १५ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. महिला आरोग्य अभियानांतर्गत तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुकास्तरावर मेळावे आयोजित करून रक्त, शर्करा तपासणी, गरोदर माता नोंदणी, रक्तदाब तपासणी, सिकलसेल, पोषण आहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिबिरात मातांना बाळाजी काळजी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हिवताप नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १० दिवसीय कार्यक्रम राबवून प्रत्येक गावात आरोग्य सेवकांद्वारे गृहभेटीचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत ५४ आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यात आला. जननी शिशू कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गरोदर मातेला रुग्णालयात भरती करण्यासाठी शासकीय वाहन उपलब्ध करून देण्यात आले. प्रसूती पश्चात आदिवासी मातांना ४०० रूपये दिल्या जात आहे. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे आरमोरी तालुक्यात मागील वर्षी एकाही मातेचा प्रसूतीदरम्यान व काळात मृत्यू झाला नाही, अशी माहिती डॉ. मोटे यांनी दिली.