रोहयोची पाच हजार कामे पूर्ण

By Admin | Updated: October 20, 2014 23:13 IST2014-10-20T23:13:51+5:302014-10-20T23:13:51+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्यावतीने २३ हजार कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार १९ कामे पूर्णत्वास आली आहेत.

Complete five thousand works of Rohochi | रोहयोची पाच हजार कामे पूर्ण

रोहयोची पाच हजार कामे पूर्ण

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्यावतीने २३ हजार कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार १९ कामे पूर्णत्वास आली आहेत. यातून हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक रोहयो मजूराला वर्षातून किमान १०० दिवसांचे काम देणे सक्तीचे आहे. एखाद्या मजुराने कामाची मागणी करूनही काम न दिल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतुदही या योजनेत आहे. या योजनेंतर्गत रस्ते, मजगी, मामा तलावाचे खोलीकरण आदी कामे केली जातात.
सध्या १ हजार २५९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकी ४९२ कामे पूर्ण झाली आहेत. ७६७ कामे अंतिम टप्यात आहेत. मजगीची ३ हजार ९५ कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी ७०० कामे पूर्ण झाली आहेत. २ हजार ३९५ कामे प्रगती पथावर आहेत. बोडी खोलीकरणाची २ हजार ३९० कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी सध्यास्थितीत १ हजार १० कामे पूर्ण झाली आहेत. १ हजार ३८० कामे सुरू आहेत.
नरेगा मधून निर्मल भारत अभियानांतर्गत ४ हजार ४१७ शौचालयाची बांधकामे करण्यात आली आहेत. निर्मल भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयासाठी ५ हजार ४०० रूपयांचे अनुदान राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत देण्यात येते. या सर्व शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेने २०१४- १५ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेंतर्गत कामांसाठी ८२ कोटी रूपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४६ कोटी १० लाख रूपये खर्च झाले आहेत. रोहयोेंतर्गत मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपिकाचा हंगाम नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना धानपिकाच्यामाध्यमातून रोजगार मिळतो. त्यामुळे या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात रोहयो कामासाठी फारसे मजूर मिळत नाही. त्याचबरोबर या कालावधीत पाऊस राहत असल्याने रोहयोची कामे करणे अशक्य होते. परिणामी या कालावधीत रोजगार हमी योजनेची कामे अत्यंत कमी प्रमाणात सुरू असतात. नोव्हेंबर महिन्यानंतर मात्र जिल्ह्यातील मजूर रिकामा होतो. त्याला इतर कोणतेही काम राहत नसल्याने तो रोजगार हमी योजनेच्याच कामावर जाणे पसंत करतो. डिसेंबर ते जून या कालावधीत सर्वाधिक रोहयोची कामे गडचिरोली जिल्ह्यात केली जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. याही वर्षी याच कालावधीत रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.
रोहयोच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या शेतात माती टाकण्याचे कामही केले जातात. फसल निघाल्यानंतर हे काम करणे सहज शक्य होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Complete five thousand works of Rohochi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.