कामातील अडथळ्यासाठी तक्रारी
By Admin | Updated: July 8, 2017 01:17 IST2017-07-08T01:17:22+5:302017-07-08T01:17:22+5:30
विकास सहकारी तांदूळ गिरणीतील विरोधी गटाचे लोक वेळोवेळी तक्रार करून कामात अडथळा निर्माण करीत आहेत.

कामातील अडथळ्यासाठी तक्रारी
संचालकांचा आरोप : घोट येथील सहकारी तांदूळ गिरणीतील धान खरेदी प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : विकास सहकारी तांदूळ गिरणीतील विरोधी गटाचे लोक वेळोवेळी तक्रार करून कामात अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे संस्थेची बदनामीही होत आहे, असा आरोप संचालकांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
घोट येथील विकास सहकारी तांदूळ गिरणीत २१ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान धान विक्रीसाठी व धान विक्री न झाल्यास भरडाई या उद्देशाने विलास बुरे यांनी घोट येथील तांदूळ गिरणीत धान आणला. सायंकाळी तांदूळ गिरणी बंद असल्याने ट्रक खाली झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता विरोधकांनी पोलिसांना बोलावले. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापिका यांनी सदर माल कुणाचा आहे हे माहित नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर सदर शेतकऱ्याने संचालकांच्या वादात आपले नुकसान होईल म्हणून स्वत:चा धान परत नेला. ३० जूनपर्यंत धान खरेदी सुरू होती. विरोधक ढिवरू बारसागडे, मिलिंद दुधबावरे, शीला वैरागडे यांनी आपसापोटी व पदाधिकाऱ्यांच्या बदनामीसाठी असा प्रकार चालविला आहे, असा आरोप सत्ताधारी संचालकांनी केला आहे. विनाकारण तक्रार करून संस्थेच्या कामात अडथळा निर्माण केला जात आहे. सभागृह बांधकाम धान खरेदी केंद्र, कर्मचारी नियुक्ती, सिमेंट विक्री व्यवसायास त्यांच्या विरोध असून कोर्टात याच विषयावर विरोधकांनी प्रकरण दाखल केले. त्यांच्या विरोधात निकाल लागून सुध्दा राजकीय आकसापोटी संस्थेचे नुकसान करीत आहेत, असे संचालकांनी म्हटले. दुसरीकडे खोट्या तक्रारी करून शेतकरी व संस्थेचे पदाधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न संचालकांनी चालविला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी विरोधी गटाने केली आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष वसंत दुधबावरे, मानद सचिव गुरूदास वैरागडे, संचालक अशोक पोरेड्डीवार, माजी सरपंच सुशील शहा, व्यवस्थापिका उपलटलवार, शेतकरी विलास बुरे आदी उपस्थित होते.