पुणे कराराचा निषेध करणाऱ्यांविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल
By Admin | Updated: September 24, 2015 01:50 IST2015-09-24T01:50:59+5:302015-09-24T01:50:59+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी,...

पुणे कराराचा निषेध करणाऱ्यांविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल
गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख बाळू टेंभुर्णे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून केली आहे.
त्यांनी यावेळी सांगितले की, डॉ. कैलास नगराळे यांनी २४ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे पुणे कराराचा धिक्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. विनय बांबोळे यांनी २५ सप्टेंबर रोजी पुणे करार निषेध सभा गडचिरोली येथे आयोजित केली आहे. तर धर्मानंद मेश्राम यांनी २० सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे पुणे कराराचा धिक्कार दिन साजरा केला. पुणे करारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी आहे. या कराराचा धिक्कार व निषेध करणे म्हणजे प्रत्यक्ष डॉ. बाबाहेबांचा धिक्कार व अवमान करणे होय, असे टेंभुर्णे यांनी म्हटले आहे.
कैलास नगराळे, विनय बांबोळे, धर्मानंद मेश्राम या तिघांविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी टेंभूर्णे यांनी केली. यासंदर्भात आपण गडचिरोलीच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. परंतु बुधवारी त्यांच्याशी चर्चा झाली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही टेंभुर्णे यांनी दिला. पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सरचिटणीस किशोर फुलझेले, तालुका संघटक परमानंद मेश्राम, प्रमोद खोब्रागडे आदी उपस्थित होते.