दस्तावेजात खाडाखोड केल्याप्रकरणी आमदाराविरूध्द तक्रार

By Admin | Updated: July 17, 2015 01:42 IST2015-07-17T01:42:43+5:302015-07-17T01:42:43+5:30

गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार देवराव होळी यांच्या अडचणी वाढत आहेत.

Complaint against maternal grievance | दस्तावेजात खाडाखोड केल्याप्रकरणी आमदाराविरूध्द तक्रार

दस्तावेजात खाडाखोड केल्याप्रकरणी आमदाराविरूध्द तक्रार

भाजपची अडचण वाढणार : देवराव होळींच्या आमदारकीवर टांगती तलवार; नारायण जांभुळे यांची राज्यपालांकडे मागणी
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार देवराव होळी यांच्या अडचणी वाढत आहेत. शासकीय सेवेत असताना त्यांनी चामोर्शी रूग्णालयातील शासकीय हजेरी रजिस्टरवर राजीनामा दिल्यानंतर अप्सेंट शब्द खोडून कार्यमुक्त लिहिल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. आधीच देवराव होळी यांच्या विधानसभा सदस्यत्वाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आला आहे. आता नवा प्रकार उघडकीस आल्याने भाजपच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शासकीय हजेरीपट रजिस्टर माहे नोव्हेंबर २०१३ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराव मादगुजी होळी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या नावापुढे अप्सेंट लिहिलेल्या ठिकाणाच्या ऐवजी अप्सेंट खोडून कार्यमुक्त केले असल्याचे दर्शवून शासकीय दस्तावेजात खोडतोड केल्याप्रकरणी विभागीय चौकशी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी लेखी तक्रारीतून नारायण दिनबाजी जांभुळे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह आरोग्य यंत्रणेच्या प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. देवराव मादगुजी होळी हे चामोर्शी येथील रुग्णालय वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या संदर्भात नारायण जांभुळे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता, शासकीय हजेरीपट रजिस्टर नोव्हेंबर २०१३ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना देवराव होळी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या नावापुढे अप्सेंट लिहिलेल्या ठिकाणी अप्सेंट खोडून कार्यमुक्त केल्याचे दर्शवून शासकीय दस्तावेजात खोडतोड केल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात पुराव्यासह रितसर तक्रार उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर यांच्याकडे करण्यात आली आहे. शासकीय हजेरीपट रजिस्टरमध्ये खोडतोड करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नारायण जांभुळे यांनी केली आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून देवराव होळी यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात नारायण जांभुळे यांनी यापूर्वीच नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे डॉ. होळी यांचे सदस्यत्व कधीही रद्द होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Complaint against maternal grievance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.