पुरवठा निरीक्षक शिधापत्रिकेसाठी पैसे घेत असल्याची तक्रार
By Admin | Updated: October 21, 2015 01:33 IST2015-10-21T01:33:01+5:302015-10-21T01:33:01+5:30
पुरवठा निरीक्षक धीरज मेश्राम यांनी आमच्याकडून दोन हजार रूपयांची मागणी केली.

पुरवठा निरीक्षक शिधापत्रिकेसाठी पैसे घेत असल्याची तक्रार
अहेरी : पुरवठा निरीक्षक धीरज मेश्राम यांनी आमच्याकडून दोन हजार रूपयांची मागणी केली. त्यापैकी एक हजार रूपये देण्यात आले. त्यानंतरच शिधापत्रिका कार्ड मिळेल, असे सांगण्यात आले होते. मागील एक महिन्यापासून शिधापत्रिका वितरित करण्यासाठी पुरवठा निरीक्षक धीरज मेश्राम मानसिक त्रास देत आहे, अशी तक्रार देवराणी राजेश मिस्त्री व कौशल्या राजू मिस्त्री रा. कमलापूर यांनी तहसीलदार अहेरी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
धीरज मेश्राम यांच्या काळात जेवढ्या शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या, त्या सर्व शिधापत्रिकांची चौकशी करण्यात यावी व पैशाची मागणी करणाऱ्या या कर्मचाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे. यासंदर्भात अहेरीचे तहसीलदार एस. आर. पुप्पलवार यांना विचारणा केली असता, मला काहीच माहीत नाही, पैसे देण्याच्या अगोदर कळविले असते तर हा प्रकार घडला नसता, लाभार्थ्याकडून पैसे घेणे ही गंभीर बाब असून सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
अहेरी तालुक्यात अनेक दुर्गम गावे येतात. येथील नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन असे प्रकार नेहमीच घडतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)