सिरोंचात तुल्यबळ लढती
By Admin | Updated: February 18, 2017 02:01 IST2017-02-18T02:01:50+5:302017-02-18T02:01:50+5:30
सिरोंचा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

सिरोंचात तुल्यबळ लढती
चार जिल्हा परिषद क्षेत्र : तालुक्यात प्रचाराला आला वेग
नागभूषणम चकिनारपुवार सिरोंचा
सिरोंचा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. चारही जिल्हा परिषद क्षेत्रांमध्ये राजकीय पक्षांनी तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविले असल्याने या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्यावासीयांचे लक्ष लागले आहे.
लक्ष्मीदेवीपेठा-अंकिसामाल या जिल्हा परिषद क्षेत्रातून विद्यमान कृषी सभापती अजय कंकडालवार यांच्या पत्नी तथा अहेरी पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती सोनाली अजय कंकडालवार या निवडणुकीच्या मैदानात आविसकडून उभ्या आहेत. सदर क्षेत्र नामाप्र महिला उमेदवाराकरिता राखीव आहे. या क्षेत्रात आणखी पाच उमेदवार रिंगणात आहेत. या जिल्हा परिषद क्षेत्रात व पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारच उभे करण्यात आले नाही. याच क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शारदा सत्यम वेमुला, भाजपच्या श्रीदेवी जयराम पांडवला, अपक्ष म्हणून नाविसचे तालुकाध्यक्ष यांची मुलगी अखिला लक्ष्मय्या रंगू, निर्मला चंद्रशेखर पुलगम तसेच शारदा मलय्या जेट्टी हे उमेदवार रिंगणात आहेत. विठ्ठलरावपेठा-जाफ्राबाद हे क्षेत्र आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. त्यामुळे या क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून काँग्रेसतर्फे सिरोंचा पंचायत समितीच्या विद्यमान सभापती लालूबाई मडावी, भाजपाच्या कमला सदाशिव गेडाम, आविसकडून वरसे वैशाली जोगा आणि बसपाकडून मंजुळा श्रीनिवास डीकोडा हे मैदानात आहेत. या जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्वच उमेदवार तुल्यबळ असल्याने अटीतटीचा सामना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
झिंगानूर-आसरअल्ली जिल्हा परिषद क्षेत्रात पाच उमेदवार रिंगणात आहेत. या क्षेत्रातील आविसचे उमेदवार तनैनी सरिता रमेश या आसरअल्ली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वैशाली दामोधर सिडाम या निवडणूक लढवित असून त्या माजी पंचायत समिती सदस्या आहेत. काँग्रेसकडून मुल्ली जोगा मडावी या रिंगणात आहेत. मात्र त्यांचा आठ दिवसांपूर्वी अपघात झाल्याने त्या रुग्णालयातच दाखल आहेत. त्यांचे कार्यकर्ते प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. भाजपतर्फे सरिता येरय्या पायम, बसपातर्फे पूजा पोचम पिल्ली निवडणूक लढवित आहेत.
नारायणपूर-जामनपल्ली हे क्षेत्र अनुसूचित जाती महिला उमेदवाराकरिता राखीव आहे. या जिल्हा परिषद क्षेत्रात चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून पुष्पलता मदनया कुमरी, राकाँतर्फे पल्लवी शिवया जाडी, काँग्रेसतर्फे बानक्का मदनय्या जिल्हापेटी, आविसकडून जयसुदा जनगम बानया हे उमेदवार रिंगणात आहेत.
पंचायत समितीच्या गणात एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत. जामनपल्ली गणातून रिकुला क्रिष्णमूर्ती राजय्या या राकाँकडून निवडणूक लढवित आहेत. रिकुली क्रिष्णमूर्ती राजय्या हे भाजपात जाण्यासाठी तयार होते. मात्र ऐन वेळेवर राकाँने त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते राकाँकडून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसतर्फे सडवलया पेट्टासमय्या कुमरी, अपक्ष म्हणून कंबगोवणी व्यंकटेश्वर रामक्रिष्टय्या, भाजपकडून कंबगोवणी सत्यनारायण आनंद तर आविसचे रिकुला नरसिंहस्वामी हे रिंगणात आहेत.