श्रीमंत जिल्ह्याला संपन्न करण्यासाठी साथ द्या
By Admin | Updated: October 12, 2014 23:33 IST2014-10-12T23:33:53+5:302014-10-12T23:33:53+5:30
गडचिरोली हा देशातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्यातील लोक आजवरच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांमुळे गरीब राहिले आहे. लोकांची ही गरीबी नष्ट करून

श्रीमंत जिल्ह्याला संपन्न करण्यासाठी साथ द्या
गडचिरोली/आलापल्ली : गडचिरोली हा देशातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्यातील लोक आजवरच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांमुळे गरीब राहिले आहे. लोकांची ही गरीबी नष्ट करून त्यांना समृद्ध व संपन्न जीवन निर्माण करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गडचिरोली येथे आयोजित भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला खासदार अशोक नेते, छत्तीसगडचे गृहमंत्री रामसिंग पैकरा, छत्तीसगडच्या कांकरचे खासदार विक्रमसिंग उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, डॉ. देवराव होळी, महामंत्री रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, प्रशांत वाघरे, महिला महामंत्री रेखा डोळस, प्रतिभा चौधरी, सदानंद कुथे, रवींद्र बावनथडे, सुधाकर येनगंधलवार, नाना नाकाडे यांच्यासह ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने अवघ्या सात महिन्यात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. या जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी व विकासाचा रथ समतोलपणे धावण्यासाठी विधानसभा निवडणुकीतही भाजपला साथ द्या, असे आवाहन मतदारांना केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील जनता गरीबी, भूखमरीने त्रस्त आहेत. जिल्ह्यात नागरिकांच्या विकासाकडे काँग्रेस-राकाँ आघाडीच्या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. महाराष्ट्र-आंध्र यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ चे काम मागील २० वर्षांपासून रखडले आहे. अनेक पूल व रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याअभावी जिल्ह्यातील विकास मागे पडला आहे. जिल्ह्यात कौशल्य, प्रशिक्षण व रोजगारभिमूख शिक्षणाची गरज आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १० हजार युवकांना रोजगार मिळू शकतो, अशी योजना आखली जात आहे. त्यामुळे अभियांत्रिकी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. या माध्यमातूनच जिल्ह्यातील गरीबी दूर होऊ शकते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळण्याकरिता नदीवर बांध बांधून ब्रिज कम बंधारे बांधण्याची केंद्र सरकारची योजना आहे. बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळू शकेल. त्याबरोबरच बसपोर्ट, वॉटरपोर्टच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व परिवहनाला चालना देण्याचीही सरकारची योजना आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.
राष्ट्रीय महामार्गावरील पूल व ब्रिजकम बंधारे बांधण्याचीही सरकारची योजना आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने आपल्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात देशातील साडेसहा लाख गावांना रस्त्यांनी जोडण्याचे काम केले. त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत झाली. पावसाळ्याचे पाणी जमिनीत मुरवून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी चेकडॅम तयार करण्याची सरकारची योजना आहे. भाजपचे राज्यात सरकार आल्यास गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना ५० टक्के सुटीवर १ लाख सोलर पंप दिले जातील. त्याबरोबरच मोहफुलापासून इंधन निर्मिती करता येईल, यासाठी उद्योग उभारण्याची ही योजना असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रचार सभेत सांगितले. जिल्ह्यात उद्योगधंद्यांची निर्मिती करून जिल्ह्यातील १० हजार युवकांना रोजगार देण्याचे आपले प्राधान्य राहील, असेही गडकरी म्हणाले.
देशात ६० टक्के लोकांकडे शौचालय नाहीत. गरीबी, भूखमरी व बेरोजगारी देण्याचे काम केवळ काँग्रेस-राकाँने केले, असा ंआरोपही गडकरी यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने जिल्ह्यातील ओबीसींवर अन्याय केला आहे. ओबीसींचे आरक्षण काँग्रेस-राकाँच्याच सरकारने कमी केले व तेच आता बहिष्काराची भाषा करीत आहेत. राकाँ-काँग्रेसच्या सरकारने राज्यातील जनतेला गरीबीत ठेवून अन्याय केला. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास ओबीसींना त्यांचे आरक्षण पूर्ववत देण्यात येईल. मात्र आदिवासींवर कुठलाही अन्याय होणार नाही, याचीही दखल घेतली जाईल. जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण भाजपतर्फे केले जाईल. जातीयवादी पक्ष म्हणून भाजपची इतर धर्मीयांना भीती दाखविली जात आहे. परंतु गरीब हा गरीब असतो, त्याला कुठलीही जात वा धर्म नसतो. मुस्लिमांना भाजपची भीती दाखविण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसमुळेच आज देशातील मुसलमान गरीबीत जीवन जगत आहेत. भारतीय जनता पक्ष मुसलमान विरोधी असता तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनविले असते काय, असा परखड सवालही नितीन गडकरी यांनी सभेत केला. राकाँ, काँग्रेस हे भारतीय जनता पक्षाविषयी जनतेच्या मनात विष पेरत आहे. त्यामुळे या पक्षांच्या तावडीतून जिल्ह्याला मुक्त करणे गरजेचे आहे.
आगामी काळात देशात ४ कोटी ७० लाख कौशल्य प्रशिक्षित उमेदवारांची गरज आहे. या दृष्टीने देशात कौशल्य व व्यवसायभिमूख प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार काम करीत आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे तर आभार महामंत्री रवींद्र ओल्लालवार यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)