पोरेड्डीवारांसह कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा
By Admin | Updated: October 11, 2014 01:38 IST2014-10-11T01:38:56+5:302014-10-11T01:38:56+5:30
गेले ३० वर्षाहून अधिक काळ गडचिरोली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजाविणारे ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार ...

पोरेड्डीवारांसह कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा
आरमोरी : गेले ३० वर्षाहून अधिक काळ गडचिरोली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजाविणारे ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार व त्यांचे बंधू गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्या शेकडो समर्थकांनी आज काँग्रेस पक्षाचा सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय आरमोरी येथे घेतलेल्या बैठकीत जाहीर केला. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा पत्राच्या प्रती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांना पाठविण्यात आल्या.
आरमोरी येथील प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानातील प्रांगणात आज सकाळी हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार हे उपस्थित होते. त्यानंतर या बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारने १५ वर्षात जिल्ह्यातील इतर मागास वर्गीयांचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही. त्यातच पेसा कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली.
या अंमलबजावणीमुळे गैरआदिवासींना वर्ग ३ आणि ४ च्या नोकरभरतीतून बाद करण्यात आले आहे. या मुद्यांवर बैठकीत विचारमंथन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी आरक्षण पूर्ववत न होण्याला पक्ष जबाबदार आहे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी काँग्रेस पक्षाकडे आजवर कधीही पद मागितले नाही. परंतु ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले. गैरआदिवासींवर होत असलेला अन्याय सहन करण्याच्या पलिकडे आहे, अशी भावना अरविंद पोरेड्डीवार यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मांडली.
त्यानंतर एकमुखाने सर्व कार्यकर्त्यांनी पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला उपस्थित जिल्हा परिषद सदस्य लंकेश भोयर, आरमोरी पंचायत समितीच्या सभापती सविता भोयर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खिळसागर नाकाडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालन डॉ. दुर्वेश भोयर, हैदरभाई पंजवानी, केशवराव कुंभारे, बाजार समितीचे उपसभापती ईश्वर पासेवार, माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीहरी कोपुलवार, आरमोरीचे उपसरपंच दीपक निंबेकार, हरिभाऊ शेबे, तुळशीराम गोंधोळे, अशोक वाकडे, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. बळवंत लाकडे, कुरखेडा तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते व्यंकटी नागीलवार, खेमराज डोंगरवार, गोविंद नागपुरकर आदींसह उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांकडे पाठविले आहे. (प्रतिनिधी)