ध्वनीक्षेपकाद्वारे कोंबड बाजाराची जाहिरात
By Admin | Updated: August 4, 2016 01:50 IST2016-08-04T01:50:49+5:302016-08-04T01:50:49+5:30
गृहखात्याच्या लेखी कोंबडबाजार भरविणे व त्यात कोंबडीच्या झुंजी लढविणे कायदेशीररित्या कारवाईस पात्र आहे.

ध्वनीक्षेपकाद्वारे कोंबड बाजाराची जाहिरात
मानापूर येथे प्रकार : सलंगटोला, येंगाडावासीयांनी केला प्रचार
मानापूर/देलनवाडी : गृहखात्याच्या लेखी कोंबडबाजार भरविणे व त्यात कोंबडीच्या झुंजी लढविणे कायदेशीररित्या कारवाईस पात्र आहे. असे असताना आरमोरी तालुक्याच्या सलंगटोला गावात भरणाऱ्या कोंबड बाजाराची लाऊडस्पीकरवरून पंचक्रोशीत माहिती देत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणेचे अशा प्रकाराकडे दुर्लक्ष कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
झाडीपट्टी, नाटक, गोंधळ, तमाशा आदींचे आयोजन केले जाते. याची जाहिरातही लाऊडस्पीकरवरून केली जाते. मात्र आरमोरी तालुक्यातील सलंगटोला-येंगाडा गावच्या नागरिकांनी चक्क कोंबड बाजार भरणार असल्याचे लाऊडस्पीकरवरून जाहीर करीत कोसरी, मांगदा, अंगारा, देलनवाडी, नागरवाही, पिसेवडधा, जांभळी, भाकरोंडी येथे प्रचार केला व या कोंबड बाजाराला उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बहुतांश कोंबड बाजारात कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जातात. अनेक कोंबड बाजारावर यापूर्वी कारवाईसुध्दा केली आहे.
कोंबडबाजारात दारू, सट्टा यासह अवैध धंद्यांचा समावेश असतो. तरीसुध्दा कोंबड बाजार भरविण्याचा प्रचार सलंगटोलावासीयानी केला. कोंबड बाजाराला कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आमचा गाव, आमचा विकास या नाविन्यपूर्ण योजनेतून गाव विकास आराखडा तयार करून गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. युवकांसाठी रोजगाराची संधी प्राप्त व्हावी, असे प्रयत्न सुरू आहे. गावाचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास व्हावा, हा हेतू असतानाही सलंगटोलावासीयांच्या वतीने कोंबड बाजार भरविण्यासाठी प्रत्येक गावात प्रचार केला जात आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घ्यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कोंबड बाजारावर बंदी घालावी, अशी मागणी मानापूर येथील नामदेव मोरघडे, तंमुस अध्यक्ष पांडुरंग गुरनुले, प्राचार्य डी. के. मेश्राम, डी. डी. मैंद, रामहरी चौधरी, सरपंच धनिराम कुमरे, मांगदा येथील बी. आर. पदा, भाजप तालुका उपाध्यक्ष रामहरी चौधरी, भास्करराव उंदीरवाडे, रामभाऊ हस्तक, वैरकर आदींनी केली आहे. (वार्ताहर)