कोळसा घेऊन जाणारा ट्रक तलावात कोसळला
By Admin | Updated: October 5, 2014 23:05 IST2014-10-05T23:05:15+5:302014-10-05T23:05:15+5:30
छत्तीसगड राज्यामधून कुरखेडा फाटा ते वैरागड मार्गे गडचिरोलीवरून आंध्रप्रदेशाकडे दगडी कोळशाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक वैरागड-कढोली दरम्यान

कोळसा घेऊन जाणारा ट्रक तलावात कोसळला
वैरागड : छत्तीसगड राज्यामधून कुरखेडा फाटा ते वैरागड मार्गे गडचिरोलीवरून आंध्रप्रदेशाकडे दगडी कोळशाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक वैरागड-कढोली दरम्यान असणाऱ्या पाटणवाडा गावालगतच्या तलावात कोसळल्याची घटना विजयादशमीच्या दिवशी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रक पूर्णत: क्षतीग्रस्त झाला असून ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
कुरखेडा फाटा ते वैरागड मार्ग अत्यंत अरूंद असल्यामुळे या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे. या अरूंद मार्गावरून जड वाहनांची वाहतूक करू नये, असे परिवहन विभागाने अनेकदा सूचविले आहे. तसेच परिवहन विभाग कुरखेडा फाटा ते वैरागड मार्गे गडचिरोली या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक करण्यास परवानगी देत नाही. मात्र अनेक ट्रकचालक रात्रीच्या सुमारास शार्टकट मार्ग अवलंबित कुरखेडा फाटा ते वैरागड या मार्गावरूनच जड वाहने नेत असल्याचे दिसून येते. जड वाहनाच्या वाहतुकीमुळे या मार्गावर गेल्या दोन वर्षात अनेकदा अपघात घडले आहेत. गतवर्षी जडवाहनांच्या धडकेमुळे तीन तडसाचा मृत्यूही झाला होता. तसेच कढोली येथील दोघेजण याच मार्गावर गतवर्षी झालेल्या जड वाहनाच्या धडकेत दगावले. कुरखेडा फाटा ते वैरागड हा मार्ग अत्यंत अरूंद आहे. मात्र या मार्गाचे रूंदीकरण वाढविण्यात आले नाही. वैरागड-कुरखेडा मार्ग, आरमोरी व कुरखेडा या दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. दोन विभागाच्या वादात या मार्गाची दुरूस्ती रखडली आहे. (वार्ताहर)